Wednesday, August 20, 2025 09:24:09 AM

सेंट मेरीस् शाळेत हिंदी सक्तीचा प्रकार उघड; मनसेचा तात्काळ हस्तक्षेप

सेंट मेरीस् शाळेत तिसरीपासून हिंदी सक्तीचा प्रयत्न; मनसेचा हस्तक्षेप, शाळेने चूक कबूल केली. शासनाचा आदेश धाब्यावर बसवणाऱ्या शाळांना आता इशारा मिळाला आहे.

सेंट मेरीस् शाळेत हिंदी सक्तीचा प्रकार उघड मनसेचा तात्काळ हस्तक्षेप

अंधेरी: अंधेरी पूर्व चांदिवली पाईपलाईन परिसरातील सेंट मेरीस् मलंकारा हायस्कूलमध्ये शासनाच्या आदेशाचा भंग करत तिसरीपासून हिंदी विषय सक्तीने शिकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच हिंदी सक्तीचा शालेय अभ्यासक्रमातील आदेश (जी.आर.) रद्द केला असतानाही, काही शाळा अद्यापही आपल्या पातळीवर असे नियम राबवत असल्याचे दिसत आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) स्थानिक पदाधिकारी तत्काळ शाळेत पोहोचले. त्यांनी शाळा प्रशासनाशी चर्चा करून शासनाच्या आदेशाचे पालन न केल्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. चर्चेनंतर शाळा प्रशासनाने आपली चूक कबूल करत, पुढे अशा प्रकारची चूक होणार नाही, असे लेखी आश्वासन दिले.

हेही वाचा: Mumbai Megablock Alert: एक्सप्रेस आणि लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; जाणून घ्या संपूर्ण यादी

मनसेने याप्रकरणावर ठाम भूमिका मांडत सांगितले, 'मराठी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. शिक्षण व्यवस्थेत तिचा अपमान खपवून घेतला जाणार नाही.'

हे प्रकरण नवीन असले, तरी यापूर्वीही राज्यातील इतर शाळांमध्ये हिंदी सक्तीचे प्रकार समोर आले आहेत. विशेषतः मुंबई व ठाणे परिसरातील काही खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदीचा सक्तीचा वापर करण्यात आल्याच्या तक्रारी नोंदल्या गेल्या होत्या.

सेंट मेरीस् प्रकरण हा त्याचाच एक ठळक पुरावा मानला जात आहे. अशा घटना म्हणजे शाळांनी पालकांवर विचारविनिमय न करताच, भाषिक सक्ती लादण्याचा गंभीर प्रकार आहे.


सम्बन्धित सामग्री