मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली होती. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये थेट खात्यात दिले जात होते. निवडणुकीपूर्वी या योजनेसाठी बहुतेक अर्ज भरणाऱ्या महिलांना सरसकट पात्र ठरविले गेले होते. मात्र, आता निवडणुकीपूर्वी महायुतीसाठी लाभदायक ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आता या योजनेत नवे निकष लागू केले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यानुसार 5 लाख महिला लाभार्थी अपात्र ठरतील.
राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या बदललेल्या निकषांची माहिती एक्सवर दिली आहे. या नव्या निकषांनुसार या योजनेतून पाच लाख महिला आता अपात्र ठरणार आहेत. जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत योजनेचे सात हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे.
हेही वाचा - HIV पॉझिटिव्ह व्यक्तीकडून 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण; तब्बल 10 महिने डांबून ठेवण्यात आईचीही साथ
या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही
आदिती तटकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या निकषांप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या 2,30,000 महिलांना वगळण्यात आले आहे. तसेच वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या 1,10,000 महिलांना योजनेतून अपात्र ठरविले गेले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या 1,60,000 महिला आहेत. यानुसार एकूण पाच लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत.
हेही वाचा - जंगलात शिकारीला गेले अन् सहकाऱ्याचीच केली शिकार, रानडुक्कर समजून झाडली गोळी
विधानसभा निवडणुकांआधी जाहीर केलेल्या अनेक योजनांचा मोठा आर्थिक ताण शासकीय तिजोरीवर येत असल्याची ओरड होत होती. यासाठी इतर योजनांचा निधी कमी केला असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या दोन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.