VIP Darshan Controversy: मुंबईतील गणेशोत्सव म्हटला की सर्वात जास्त चर्चेत येणारं नाव म्हणजे लालबागचा राजा. देशभरातून लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात. मात्र, यावर्षी लालबागच्या राजाच्या दर्शन व्यवस्थेमुळे वादंग निर्माण झाले आहे. व्हीआयपी आणि सामान्य भक्तांसाठी स्वतंत्र रांग ठेवल्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून मानवाधिकार आयोगाने या प्रकरणात थेट हस्तक्षेप केला आहे.
व्हीआयपी- सामान्य भक्तांत भेदभावाचा आरोप
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजा मंडळाकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्वतंत्र रांग ठेवण्यात आली होती. या रांगेतून काही मिनिटांतच दर्शन होत असल्याचे दृश्य समोर आले. दुसरीकडे, सामान्य भाविकांना तासन्तास रांगेत उभं राहून दर्शन मिळतं. या व्यवस्थेमुळे भक्तांच्या भावनांचा अपमान होत असल्याचं म्हणत तक्रार दाखल करण्यात आली.
आयोगाची दखल
ही तक्रार अॅड. आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी मानवाधिकार आयोगाकडे केली होती. आयोगाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत मंडळासह अनेक शासकीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. यात राज्याचे मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई पोलिस आयुक्त आणि मुंबई महापालिका आयुक्त यांचा समावेश आहे. मंडळाचे अध्यक्ष व सचिवांना सहा आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 ऑक्टोबरला होणार आहे.
हेही वाचा: Toll Exemption In Maharashtra : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, समृद्धी महामार्ग, अटल सेतूवर प्रवाशांना टोलमाफी; 'या' अटींसह वाहनांना प्रवासाची परवानगी
गर्दीमुळे वाढतो त्रास
लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त मोठ्या संख्येने मुंबईत येतात. यामुळे गणेशोत्सव काळात परिसरात प्रचंड गर्दी असते. अनेक भक्तांना दहा-दहा तास रांगेत उभं राहावं लागतं. अशा वेळी काहींना व्हीआयपी मार्गातून सहज दर्शन मिळाल्याने सामान्य भक्तांमध्ये नाराजी पसरते.
मंडळाची बाजू
लालबागच्या राजाच्या मंडळाकडून दरवर्षी दर्शन व्यवस्थेसाठी विशेष तयारी केली जाते. व्हीआयपी व्यक्तींसाठी वेगळी रांग ठेवण्यामागे सुरक्षा आणि शिस्तीचे कारण असल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. मात्र, मानवाधिकार आयोगाच्या नोटिसीनंतर मंडळावर दबाव वाढला आहे.
भाविकांची अपेक्षा
भक्तांची अपेक्षा सोपी आहे 'राजा सर्वांचा आहे.' मग दर्शन व्यवस्थेत कोणताही भेदभाव नको, अशी मागणी होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त करत सर्वांसाठी समान नियम असावेत, असं मत मांडलं आहे.
गणेशोत्सव हा आनंद, श्रद्धा आणि भक्तीचा सण मानला जातो. मात्र, दर्शन व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या भेदभावाच्या भावना उत्सवाचा गोडवा कमी करतात. मानवाधिकार आयोगाने घेतलेल्या दखलीनंतर आता लालबागचा राजा मंडळ पुढे कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.