Sunday, August 31, 2025 04:39:02 PM

जंगलात शिकारीला गेले अन् सहकाऱ्याचीच केली शिकार, रानडुक्कर समजून झाडली गोळी

जिल्ह्यातील मनोरच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या काही जणांनी आपल्या सोबतच्या एका सहकाऱ्याला गोळी मारल्याची घटना समोर आली आहे.

जंगलात शिकारीला गेले अन् सहकाऱ्याचीच केली शिकार रानडुक्कर समजून झाडली गोळी

पालघर : जिल्ह्यातील मनोरच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या काही जणांनी आपल्या सोबतच्या एका सहकाऱ्याला गोळी मारल्याची घटना समोर आली आहे. रमेश वर्था (वय 60) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्यासह आणखी काही जण शिकार करण्यासाठी जंगल परिसरात गेले होते. यावेळी अंधारात रस्ता भरकटकल्यानंतर काहीजणांनी रानडुक्कर समजून आपल्याच सहकाऱ्यावर गोळीबार केला.

या घटनेची अधिक माहिती देताना पालघरचे पोलीस उपाधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांनी सांगितलं की, 28 जानेवारी रोजी पालघर जिल्ह्याच्या बोरशेती गावातील एक गट मनोर येथील आलन टेकड्यांवर शिकार करण्यासाठी गेला होता. या घटनेत मृत्यू पावलेले गृहस्थ रमेश वर्था दुसऱ्या दिवशी 29 जानेवारीला या शिकारीला गेलेल्या गटात सामील झाले होते. 29 जानेवारीच्या रात्री शिकार करत असताना वर्था यांच्यासह आणखी एकजण रस्ता भरकटकले होते.

हेही वाचा - कशी नशिबानं थट्टा आज मांडली! शिकार आणि शिकारी एकाच विहीरीत; रानडुकराचा काळ आला होता, पण..

मृतदेह झाडीत लपवला
या गोळीबारात वर्था यांचा जागीच मृत्यू झाला. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर शिकारीसाठी गेलेल्या तरुणांनी संबंधित व्यक्तीचा मृतदेह झाडीत लपवून घर गाठलं. पण नऊ दिवसांनी हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा - Viral News: 'या' कारणाने मुलाच्या कुटुंबीयांनी थांबवला विवाह, मग काय.. नवरीने थेट पोलिसांनाच बोलावलं

रानडुक्कर समजून गोळी झाडली
दरम्यान, दुसरा गट देशी बंदुका घेऊन शिकार करण्यासाठी दबा धरून बसले होते. तेवढ्यात रमेश वर्धा आणि आणखी एकजण त्या ठिकाणी आले. जमीनीवर पडलेल्या वाळलेल्या पानांमुळे त्यांच्या चालण्याचा आवाज शिकारी करणाऱ्या गटाला आला. यावेळी रानडुक्कर समजून बंदूक घेऊन लपलेल्या गटातील एक जण सागर नरेश हडल (28) याने वर्था यांच्यावर गोळी झाडली. ज्यात वर्था यांचा जागीच मृत्यू झाला. हा सगळा प्रकार घडल्यानंतर शिकारीसाठी गेलेल्या गटाने झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना आणि मृताच्या घरच्यांना देण्याऐवजी वर्था यांचा मृतदेह जंगलातील एका झुडुपात लपवून ठेवला आणि घटनास्थळावरून पळ काढला. 
 

कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह
वर्था घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सगळीकडे त्यांचा शोध घेतला. पण वर्था कुठेच आढळून आले नाहीत. शेवटी वर्था यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेत, पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी सखोल तपास करत आरोपी सागर हडल याला ताब्यात घेतलं, त्याची चौकशी केली असता इतर संशयितांची नावं पोलिसांना समजली. हा प्रकार समजल्यानंतर बुधवारी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रमेश वर्था यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
 

नऊ जणांना अटक
या घटनेसंदर्भात पोलिसांनी हडलसह नऊ जणांना अटक केली आहे. मनोर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम 105 (सदोष मनुष्यवध), 238 (पुरावे नष्ट करणे) आणि 3(5) (सामान्य हेतूने केलेले गुन्हेगारी कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


सम्बन्धित सामग्री