मुंबई: शहराला रोज पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा मोठा हिस्सा खाजगी टँकरमार्फत पुरवला जातो. मात्र, टँकर चालक आणि मालकांच्या संपामुळे मुंबईकरांच्या रोजच्या पाण्याच्या गरजांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने परिस्थिती हाताळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 लागू करत उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.
संपाचे कारण काय?
केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून (CGWA) खाजगी विहिरींना मिळणाऱ्या एनओसीबाबत नवीन अटी लागू करण्यात आल्यामुळे टँकर मालकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत संप पुकारला आहे. बीएमसीने CGWA कडून एनओसी बंधनकारक केल्यामुळे टँकर चालक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आणि संपाची घोषणा केली. या नोटिसा सध्या 15 जूनपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.
पाणी संकट टळवण्यासाठी बीएमसीच्या प्रमुख उपाययोजना:
1. टँकर अधिग्रहण आणि मनुष्यबळ नेमणूक:
बीएमसीने आवश्यक त्या टँकर्स, ड्रायव्हर्स, क्लीनर्स आणि कर्मचाऱ्यांची यादी तयार केली असून त्यांची नियुक्ती विभागीय कार्यालयात करण्यात आले आहे.
2. आपत्कालीन अधिसूचना:
आपत्ती व्यवस्थापन आणि विधी विभागाच्या सहकार्याने विशेष अधिसूचना जारी करून टँकर ताब्यात घेण्याचा अधिकार दिला गेला आहे.
3. वॉर्डनिहाय पथके:
प्रत्येक विभागात वॉर्डनिहाय पथके गठित करण्यात आली असून त्यामध्ये जल अभियंता, आरोग्य अधिकारी, पोलीस आणि परिवहन अधिकारी यांचा समावेश आहे.
4. नागरिकांना टँकरसाठी ऑनलाईन व ऑफलाईन सुविधा:
खासगी सोसायट्यांनी सीएफसी केंद्रांवर जाऊन आवश्यक रकमेचा भरणा करून टँकरसाठी मागणी नोंदवावी लागणार आहे. यासाठी युपीआय किंवा रोख भरण्याची सुविधा दिली आहे.
5. 25% प्रशासकीय शुल्क:
टँकरच्या मूळ किंमतीवर 25 टक्के प्रशासनिक शुल्क अधिक आकारण्यात येणार आहे.
6. पोलीस संरक्षण:
टँकर भरण्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त दिला जाणार असून, जमावबंदी व कायदा सुव्यवस्था राखण्यावर विशेष भर.
7. लेखा आणि पावती यंत्रणा:
पाणीपुरवठ्यानंतर पावती सादर केल्यावर बीएमसी लेखा विभाग टँकर चालकांना अधिकृत रक्कम अदा करेल.
8. नियंत्रण व पर्यवेक्षण:
परिमंडळीय सहआयुक्त आणि पोलीस उपायुक्त हे या कार्यपद्धतीवर नजर ठेवून बदल आवश्यक असल्यास योग्य ती सुधारणा करू शकतील.
9. अनुदान व खर्च व्यवस्थापन:
उपाययोजनांसाठी लागणारा निधी सहायक आयुक्तांना दिला जाईल आणि सर्व खर्चाचे हिशोब राखले जातील.
मुंबईसारख्या महानगरात पाणी ही मूलभूत गरज आहे. टँकर संपामुळे निर्माण झालेली टंचाईची स्थिती लक्षात घेता, बीएमसीने वेळेवर केलेली ही धोरणात्मक आणि रचनात्मक तयारी शहरवासीयांसाठी दिलासादायक ठरत आहे.