मुंबई: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 7 सप्टेंबर रोजी पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत, सर्व जलद मार्गावरील उपनगरीय गाड्या गोरेगाव आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जातील. ब्लॉकदरम्यान, काही उपनगरीय गाड्या रद्द केल्या जातील. तसेच, अंधेरी आणि बोरिवलीच्या काही गाड्या हार्बर रेल्वे मार्गावर गोरेगावपर्यंत चालवल्या जातील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली आहे.
हा मेगा ब्लॉक 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होऊन दुपारी 3 वाजेपर्यंत चालणार आहे. या काळात, जलद मार्गावरील सर्व लोकल गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या जातील. त्यामुळे, प्रवासाला जास्त वेळ लागू शकतो. तसेच, यादरम्यान काही गाड्या रद्द होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांना गर्दी आणि गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या काळात ट्रॅक, ओव्हरहेड इक्विपमेंट, आणि सिग्नल देखभाल यांसारखी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. तसेच, लोकल सेवा सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी ही कामे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 'गैरसोय होऊ नये, यासाठी प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करून घ्यावे, असा सल्लाही रेल्वे अधिकाऱ्यांनी दिला आहे.