मुंबई : शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणूक एकत्रित लढवणार आहेत. बेस्ट पतपेढीची ही निवडणूक 18 ऑगस्टला होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसेच्या मनसे कर्मचारी सेनेने एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. उत्कर्ष पॅनल नावाने त्यांची निवडणूक पत्रिका काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, निवडणुकीसाठीचा मनसे आणि शिवसेनेचा जागा वापट फॉर्म्युला ठरला असून सर्वाधित जागेवर शिवसेनेचे उमेदवार देण्यात आले आहेत. ठाकरे बंधूंचा उत्कर्ष पॅनेल एकूण 21 जागा लढवणार असून राज ठाकरे यांची सेना 2 तर उद्धव ठाकरे यांच्या कामगार सेनेने 19 जागांवर उमेदवार दिले आहेत.
हेही वाचा : Piyush Goyal : 'व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत कोणासमोरही झुकणार नाही'; पियुष गोयल यांचे प्रतिपादन
बेस्ट पतपेढीमध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्या बेस्ट कामगार सेनेची सत्ता आहे. मागील नऊ वर्षाच्या कालावधीत बेस्ट कामगार सेनेच्या संचालक मंडळाने केलेल्या कामगार कल्याणकारी कामामुळे कामगारांचा प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्यामुळे अजून ताकद वाढली आहे, याचा पतपेढीच्या निवडणुकीत सकारात्मक परिणाम होणार यांत शंका नाही, अशी प्रतिक्रिया सेना-मनसेतून येत आहे.