नवी मुंबई: गुगल मॅपचा वापर करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. गुगल मॅपच्या नादात महिला कारसकट खाडीत जाणार होती. मात्र सागरी सुरक्षा पोलिसांमुळे तिचे प्राण वाचले आहेत. नवी मुंबईच्या बेलापूर जेट्टीमधील ही घटना आहे.
गुगल मॅपच्या चुकीच्या दिशानिर्देशामुळे एक धक्कादायक अपघात घडला. उलवे येथे जाण्यासाठी कार चालवणारी एक महिला गुगल मॅपच्या आधारे वाट पाहत होती. मात्र, बेलापूर खाडीपुलावर जाण्याऐवजी तिने चुकीच्या मार्गाचा अवलंब केला. ज्यामुळे तिची कार थेट खाडीत कोसळली. सुदैवाने, सागरी सुरक्षा पोलिसांच्या सतर्कतेमुळे या महिलेचे प्राण वाचले.
हेही वाचा: दिव्या देशमुख आणि कोनेरु हम्पीमध्ये होणार अंतिम लढत
सागरी सुरक्षा पोलिसांमुळे महिलेचे प्राण वाचले
गुगल मॅपचा आधार घेऊन उलवेला जात असणारी भरधाव कार थेट खाडीत कोसळल्याची धक्कादायक घटना बेलापूर जेट्टीजवळ घडली. सागरी सुरक्षा पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचवत क्रेनच्या साहाय्याने खाडीत पडलेली कार देखील बाहेर काढण्यात आली. एक महिला कारने उलवेच्या दिशेने जात असताना बेलापूर येथील खाडीपुलावर जाण्याच्या ऐवजी त्यांनी पुलाखालील मार्ग निवडला. यामुळे गुगल मॅपवर दिसत असल्याप्रमाणे तिथे सरळ रस्ता असल्याचे त्यांना वाटले. जेट्टीला सुरक्षा कठडा नसल्याने त्यांची कार थेट ध्रुवतारा जेट्टीवर जाऊन खाडीत कोसळली. सुदैवाने हा प्रकार जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनात आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कारमधील महिला वाहत जात असल्याचे दिसताच त्यांना रेस्क्यू बोटीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. तर खाडीत पडलेली कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली. गुगल मॅपवर रस्ता पाहत जात असताना रस्ता संपून पुढे जेट्टी असल्याचे न कळाल्याने हा अपघात घडल्याचे सदर महिलेने पोलिसांना सांगितले. त्यामुळे इच्छित स्थळी जाण्यासाठी गुगल मॅप वापरताना काळजी घ्या अन्यथा आपली देखील अशी पंचायत होऊ शकते.