मुंबई: राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. काही काळापूर्वी मनसे आणि शिंदे गटामध्ये माहिम विधानसभा मतदारसंघावरून तणाव निर्माण झाला होता. मनसेचे अमित ठाकरे उमेदवार असतानाही महायुतीने उमेदवार देत स्पर्धा निर्माण केली आणि अखेर शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार महेश सावंत विजयी झाले. यामुळे राज ठाकरे आणि शिंदे यांच्यातील संबंध ताणले गेले होते. मात्र आता, एकनाथ शिंदेंनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन स्नेहभोजन घेतल्याने पुन्हा सलोख्याचे संकेत मिळत आहेत.
या भेटीवर विचारले असता शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी परखड प्रतिक्रिया दिली. 'मी या भेटीला फारसा महत्त्व देत नाही, त्यामुळे यावर बोलणं योग्य नाही,'असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे या घडामोडींना दुय्यम स्थान दिलं. याच दरम्यान, नाव न घेता त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर उपरोधिक टीका करत म्हटलं की, 'ते एक गँग चालवतात आणि नाराजीचं नाटक करत गावी जाऊन प्रॅक्टिस करून परत येतात.' अशा शब्दांत त्यांनी शिंदेंच्या राजकीय शैलीवर घणाघात केला. या विधानांमुळे ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट होत असून, शिवसेनेच्या गटांतील तणाव अधोरेखित होतो आहे.
दुसरीकडे, शिंदे यांनी या भेटीचं स्पष्टीकरण देताना सांगितलं की, ही केवळ सदिच्छा भेट होती आणि त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देताना शिंदे यांनी राज ठाकरे यांच्याशी झालेले जुने संवाद आणि किस्से शेअर केल्याची माहिती दिली. यावरून अनेक राजकीय विश्लेषक आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिंदे गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवू लागले आहेत.