मुंबई : भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून 2014 आणि 2019 आणि 2024 आमदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच तीन वेळा भाजपाच्या मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातून 26 हजार 911 मताधिक्याने प्रथम विजयी तर सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा 26,550 मताधिक्य राखून विजयी आता याच मतदार संघातून विजयाची हॅट्रिक केली. महाराष्ट्र विधानपरिषदेवर जुलै 2012 रोजी आमदार म्हणून बिनविरोध निवडून आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान गृहमंत्री अमित शाह आणि तत्कलीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या सन 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईत भाजपाने 33 जागांवरून तब्बल 83 जागा मिळवून घवघवीत यश संपादन केले. या निवडणुकीत आमदार अॅड आशिष शेलार यांनी मुंबई भाजपाचे नेतृत्व केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीपुर्वी सन 2014 ला महागर्जना रॅली, बीकेसीतील मैदानात झाली. त्याच्या नियोजनात प्रमुख सहभाग आमदार अॅड आशिष शेलार याचा होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या लोकसभा 2014 व विधानसभेच्या निवडणुकांमध्येही मुंबईतून भाजपाला मोठे यश मिळाले. त्यावेळीही आमदार अॅड आशिष शेलार यांचे मुंबईतील नेतृत्व लक्षवेधी ठरले. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे सहाही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष म्हणून सन 2013 पासून दोन टर्म काम करुन त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. विविध उपक्रम, आंदोलने आणि सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारे असल्याने भाजपातील एक सर्व समावेशक आणि आक्रमक नेतृत्व अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेप्रमाणे "सबका साथ सबका विकास" या धोरणाने पक्ष संघटन मजबूत करण्यात त्यांना यश आले. त्यामुळे पक्षाने मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पुन्हा तिसऱ्यांदा त्यांच्यावर मुंबई भाजपाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली. मुस्लिम, ख्रिश्चन अशा अल्पसंख्याक समाज घटकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवून त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यातून एक सर्वसमावेशक व आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष तसेच विधान परिषद आणि विधानसभेत आमदार म्हणून त्यांनी नागरी चळवळीत आपला विशेष सहभाग नोंदवला. रस्त्यावरच्या संघर्षाबरोबर त्यांनी सभागृहातही महाराष्ट्राच्या विविध विषयात अत्यंत अभ्यासपूर्ण भूमिका मांडल्या. त्यांना विधान सभेतील उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळाला. तर संपर्क या सामाजिक संस्थेने सर्वेक्षणात विधानसभेत सर्वात जास्त प्रश्न मांडणाऱ्या आमदारात अॅड आशिष शेलार नंबर 2 वर होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर कर्नाटकातील दोन लोकसभा मतदार संघांची निवडणुक जबाबदारी देण्यात आली होती. तर गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर सुरतमधील मतदार संघांची जबाबदारी पक्षाने सोपविली होती. या दोन्ही निवडणुकांमध्ये त्या भागात पक्षाला चांगले यश मिळवून देण्यात ते यशस्वी झाले तर हैद्राबाद महापालिका निवडणुकीतही त्यांना जबाबदारी देण्यात आली होती. तिथेही पक्षाला चांगले यश मिळाले. लोकसभा 2024 च्या निवडणुकांसाठी कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली.
मुंबईतील एलफिस्टन येथे रेल्वे पुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर संरक्षण मंत्र्यांना भेटून त्यांनी सैन्यदलामार्फत तातडीने पादचारी पुल उभारण्याची संकल्पना मांडली व त्यानुसार विक्रमी वेळात हा पुल उभारला गेला. इतिहासात प्रथमच मुंबईत सैन्यदला मार्फत असे काम करण्यात आले. राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री म्हणून त्यांना मिळालेल्या सुमारे सहा महिन्यांच्या कालखंडात त्यांनी 100 निर्णय घेऊन लक्षवेधी काम केले. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांमध्ये लोकप्रिय शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी लौकिक मिळविला.
सतत मुंबईकरांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणारा नेता अशी त्यांची ओळख असून गणेशोत्सव मंडळे, दहिकाला उत्सव मंडळे, नवरात्र उत्सव मंडळे यांचे वेळोवेळी प्रश्न सोडवून या पारंपारिक उत्सवांची परंपरा टिकली पाहिजे यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत लढत दिली. त्यांचे बालपण म्हाडाच्या संक्रमण शिबिरात गेले त्यामुळे सध्या दुर्दशा झालेल्या या संक्रमण शिबिरांचा पुर्नविकास झाला पाहिजे, त्यांच ठिकाणी रहिवाशांना मोफत घरे मिळाली पाहिजेत यासाठी त्यांनी पाठपुरावा करून अखेर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात संक्रमण शिबिराच्या पुर्नवसनाचे धोरण तयार करून घेण्यात त्यांना मोठे यश आले. त्याचप्रमाणे कोळीवाडे, गावठाणे यांचा पुर्नविकास व्हावा, त्यांच्यासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली असावी, सिमांकन व्हावे यासाठी ते सतत पाठपुरावा करीत असून आजही हा लढा सुरू आहे. कोविड काळात विधिमंडळाचे अधिवेशन होत नव्हते त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्राचा दौरा करुन त्यांनी भाजपाचे आमदार, खासदारांच्या वैयक्तीक भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, प्रश्न समजून घेऊन पक्षाकडे त्याचा अहवाल सादर करण्यात त्यांना यश आले.
भूषविलेली अन्य पदे :
अभाविप, मुंबई सचिव
भाजपा, युवा मोर्चा, मुंबई अध्यक्ष
1995 भाजपा महाअधिवेशन कार्यकारिणी सदस्य (कोअर टीम)
मुंबई महानगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक, (खार पश्चिम वॉर्ड)
भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष
मुंबई महानगरपालिकेत भाजपा नगरसेवकांचे गटनेते
सुधार समितीचे अध्यक्षपद भूषविले
सदस्य एमएमआरडीए
मुंबई मेट्रो हेरीटेज सोसायटीचे गव्हर्नर
वांद्रे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सल्लागार
क्षत्रिय गडकरी मराठा महासंघाचे महाराष्ट्र समाज संस्थेमध्ये सक्रिय