Wednesday, August 20, 2025 09:24:06 AM

मिरवणुकीत बाबासाहेबांचा फोटो हातात घेऊन धसांनी केला धडाकेबाज डान्स

बीड जिल्ह्यातील कडा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मिरवणुकीत आमदार धस यांच्या डान्समुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मिरवणुकीत बाबासाहेबांचा फोटो हातात घेऊन धसांनी केला धडाकेबाज डान्स

बीड: हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, डोक्यावर आकर्षक टोपी आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा प्रकाश, 'अरे दिवानो.. मुझे पहचानो.. कहा से आया.. मैं हूँ डॉन' या लोकप्रिय गाण्यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मिरवणुकीत धडाकेबाज डान्स केला. बीड जिल्ह्यातील कडा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मिरवणुकीत आमदार धस यांच्या डान्समुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दरवर्षीप्रमाणे, यंदाही कडा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र यावेळी एक विशेष आकर्षण ठरलं आणि ते म्हणजे भाजप आमदार सुरेश धस यांचा धडाकेबाज डान्स. त्यांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली. सध्या त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

सामान्य माणसांमध्ये मिसळण्याची आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्याची क्षमता मोजक्याच नेत्यांमध्ये असते आणि त्यापैकी एक म्हणजे आमदार सुरेश धस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, कार्य आणि त्यांनी समाजासाठी केलेले संघर्ष आमदार सुरेश धस यांच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीत डान्स करून त्यांनी त्यांच्या कार्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

धस यांनी डान्स करत दिला संदेश:

या मिरवणुकीमध्ये आमदार धस यांनी डान्स करत बाबासाहेबांचा फोटो उंचावून दाखवून सामाजिक समतेचा संदेश दिला. राजकारणात केवळ भाषणं नव्हे, तर कृतीतून भावना व्यक्त होतात.

या हटके अंदाजातील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काहींनी यावर 'लोकशाहीचा जल्लोष' अशी प्रतिक्रिया दिली, तर काहींनी 'राजकारणातला डॉन अंदाज' अशी प्रतिक्रिया दिली. एकंदरीत, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आपल्या अनोख्या शैलीत बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देत राजकारणातील औपचारिकतेला एक नवा ट्विस्ट दिला आहे. त्यांच्या या अंदाजामुळे बाबासाहेबांच्या जयंती मिरवणुकीत उत्साह, ऊर्जा आणि लोकसहभाग अधिक वाढला आहे.


सम्बन्धित सामग्री