Beed Crime: बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला कुख्यात आरोपी गोट्या गित्ते उर्फ ज्ञानोबा मारुती गित्ते सध्या एका खून प्रकरणात फरार आहे. त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झालेली असून पोलीस त्याच्या शोधात आहेत. मात्र पोलिसांचा शोध सुरु असतानाच गोट्या गित्तेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांना थेट धमकी देताना दिसतोय.
या व्हिडिओमध्ये गोट्या गित्ते म्हणतो, "जितेंद्र आव्हाड तुमचे माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग येत आहेत. त्यात तुम्ही सॉरी सॉरी म्हणाताना दिसत आहेत. तुम्हा वंजारी समाजाचे नाही आहात. तुम्हाला वाल्मिक कराड यांची बदनामी करणे महागात पडणार आहे."
त्याचबरोबर पुढे तो म्हणतो, 'मी लहान माणूस आहे. मला फाशी होईल अथवा नाही, पण माझ्या दैवताला टार्गेट करु नका. तुम्ही धनंजय मुंडेना टार्गेट केलं आहे. परळीत येऊन गरीब श्रीमंत कोणालाही विचारा की अण्णा कोण आहेत ते. सगळेजण त्यांनी दैवत म्हणतील. मी आत्महत्या केली तर त्याचे जबाबदार तुम्ही असाल. जय हिंद जय महाराष्ट्र.'
या धमकीने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, फरार आरोपीकडून थेट आमदाराला उद्देशून अशी भाषा वापरली जाणं गंभीर मानलं जात आहे. या व्हिडिओमुळे पोलीस आणि गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाल्या असून, गोट्या गित्तेचा ठावठिकाणा शोधण्यासाठी तपास अधिक गतीने सुरु करण्यात आला आहे.