Wednesday, August 20, 2025 09:20:33 AM

'आपलं वाटोळं झालं, हिंजवडीचं आयटी पार्क चाललं बंगळुरू आणि हैदराबादला'; अजितदादा संतापले

शनिवारी अजित पवार पुन्हा एकदा हिंजवडीतील समस्या आणि विकास कामांचा आढावा जाणून घेण्यासाठी आले होते. यावेळी, अजित पवारांनी हिंजवडीतील सरपंच यांना सर्वांसमोर खडेबोल सुनावले.

आपलं वाटोळं झालं हिंजवडीचं आयटी पार्क चाललं बंगळुरू आणि हैदराबादला अजितदादा संतापले

पिंपरी-चिंचवड: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार मागील काही दिवसांपासून हिंजवडीतील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना आदेश देत होते. अशातच, शनिवारी अजित पवार पुन्हा एकदा हिंजवडीतील समस्या आणि विकास कामांचा आढावा जाणून घेण्यासाठी आले होते. तसेच, सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांवर कलम 353 लागू करण्याचे निर्देश अजितदादांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी, अजित पवारांनी हिंजवडीतील सरपंच यांना सर्वांसमोर खडेबोल सुनावले. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेकांना हा प्रश्न पडला आहे की अजित पवार इतके आक्रमक का झाले होते? चला तर सविस्तर जाणून घेऊया.

'आपलं वाटोळं झालं' - अजित पवार

कामाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना खडेबोल सुनावले. 'अहो असू द्या, असू द्या हो साहेब, धरणं करताना मंदिर जातातच की नाही. तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो, मी काय करायचे ते करतो. आपलं वाटोळं झालं, माझ्या पुण्यातून-महाराष्ट्रातून हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बंगलोर- हैदराबादला बाहेर चाललं. तुम्हाला काय पडलं नाही. कशाला मी सहा वाजता येतो? मला कळत नाही? माझी माणसं नाहीत? हे केल्याशिवाय गत्यंतर नाही', असं म्हणत अजित दादा हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांच्यावर संतापले. 

हेही वाचा: 'रात्री शूटिंग अन् सकाळी सेटवर...'; संतप्त रुपाली भोसलेने शेअर केला अनुभव

'...तर 353 कलम टाका' - अजित पवार

या दरम्यान, अजित पवार पहाटेच अधिकाऱ्यांवर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. 'सरकारी कामात जर कोणी अडथळा निर्माण केलं तर, त्याच्या विरोधात कलम 353 दाखल करा, मग ते कोणी का असेना. कारण त्याच्याशिवाय हे काम होणार नाही. आपल्याला संपूर्ण काम पूर्ण करायचं आहे', असं अजित पवार म्हणाले. 

अजित पवार एक्शन मोडवर

शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीतील सर्व समस्यांची पाहणी केली. तसेच, रस्ते वाहतूक कोंडी आणि इतर नागरी समस्यांवर अजित पवार पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या दरम्यान, अजित पवार यांनी मेट्रो प्रशासन आणि पीएमआरडीए प्रशासनाला सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. 

'आपले वाटोळ झाले आहे हे अजित दादा यांनीच मान्य केले हे उत्तम' - विजय वडेट्टीवार

शनिवारी दुपारी, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स पोस्ट करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली.  विजय वडेट्टीवार म्हणाले, 'राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या तोंडून सत्य बाहेर आलेच, आपले वाटोळ झालं आहे हे अजित दादा यांनीच मान्य केले हे उत्तम! फक्त कॅमेरा बंद केल्याने सरकारचं अपयश लपून राहत नाही'.

'परराज्यात गेलेले उद्योग, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्टरची लागलेली वाट, ट्रॅफिक मॅनेजमेंट नाही, भिकारी झालेलं सरकार, मंत्री आणि सत्ताधारी आमदारांचे बेधुंद वागणे हे या राज्याचे वाटोळे होण्यासाठी कारणीभूत आहे आणि हा तुमचाच कारभार आहे! ही सर्व परिस्थिती आणि विकासाचा खोटा ढोल तुम्ही वाजवत आहे हे सत्य जनतेला पण आता दिसत आहे! महायुतीच्या विकासाचा भकास चेहरा अर्थमंत्री अजित दादानी समोर आणला यासाठी त्यांचे आभार!', असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. 


सम्बन्धित सामग्री