Gulabrao Devkar: राज्याच्या राजकारणात एक मोठा आणि गंभीर मुद्दा समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना 10 कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. देवकर हे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन असताना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या संस्थेला श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ या संस्थेला बँकेच्या माध्यमातून तब्बल 10 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. या व्यवहारात त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचे स्पष्ट होत असून, यासंदर्भातील चौकशी अहवालात त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे उपनिबंधक मनोज चौधरी यांनी विभागीय सहनिबंधकांकडे हा चौकशी अहवाल सादर केला आहे. या अहवालात बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 च्या कलम 20 च्या उल्लंघनाचा स्पष्ट उल्लेख असून, बँकेच्या नियमांचे आणि नैतिकतेचे गंभीर उल्लंघन झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा: नांदेडमध्ये सरकारी अन्न योजनेच्या आमिषाने 14 हजार गरिबांची 1.85 कोटींची फसवणूक
राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण अधिकच संवेदनशील ठरत आहे. काही आठवड्यांपूर्वीच गुलाबराव देवकर यांनी शरद पवार यांच्या गटाचा राजीनामा देत अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला होता. त्यांच्या या निर्णयाला जिल्ह्यातील महायुतीतील नेते, विशेषतः शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी जोरदार विरोध दर्शवला होता. यापूर्वीच्या निवडणुकीत देवकर यांनी पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
एकीकडे पक्षांतर आणि दुसरीकडे चौकशी अहवालातील दोषारोप, यामुळे गुलाबराव देवकर यांच्या राजकीय कारकिर्दीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. भविष्यात त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यामुळे जिल्हा आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल निर्माण होण्याची शक्यता आहे.