मुंबई: कोल्हापूरमध्ये शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येतील आणि एकत्र निवडणुका लढतील, अशा चर्चा पाहायला मिळत आहेत. यातच आता शरद पवार यांनी याबाबत मोठे विधान केले आहे.
शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले, "राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे. महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होणार नाही. दोघांचीही मुंबईत ताकद आहे, त्याचा फायदा आम्हाला होईल. आगामी काळातील महापालिकेच्या निवडणुका मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र लढण्याची दाट शक्यता आहे. दोघे भाऊ एकत्र येऊन आपआपल्या पक्षाची ताकद दाखवतील. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळं समीकरण बघायला मिळेल."
हेही वाचा: Avinash Jadhav On Meenatai Thackeray Statue: '24 तासात कारवाई झाली नाही तर...'; अविनाश जाधवांचा इशारा
शरद पवार मराठा आरक्षणावरही बोलले आहेत. ते म्हणाले, हैदराबाद गॅजेट एक दिशा दाखवत आहे. मला याची प्रत (कॉपी) मिळाली आहे. सामंजस्य राहावं, एकीची वीण कायम राहावी, हे सगळ्यांना वाटतंं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भुजबळ यांनी एकत्र बसून राज्यात सामंजस्य राहावे यासाठी प्रयत्न करावेत. कारण गावागावात कटुता निर्माण झाली आहे. हे नक्कीच घातक आहे. विखे यांच्या समितीमध्ये सगळ्या जातीचे सदस्य आहेत. तर दुसऱ्या बाजूला बावनकुळे यांच्या समितीमध्ये सगळे ओबीसी सदस्य आहेत. अशामध्ये सामाजिक कटुता कशी कमी होईल. राज्याचे हित ज्यामध्ये आहे, त्या मार्गाने जावं लागेल. हाके किंवा आणखी लोक काही बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कटुता निर्माण झाली आहे. कटुता इतकी निर्माण झाली आहे की, एकमेकांच्या व्यवसायाकडे लोक जात नाहीत. हे चित्र महाराष्ट्रात कधीही नव्हतं असंही शरद पवार म्हणाले आहेत.
शरद पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, यामुळे शेतकरी संकटात आहेत. अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या आहेत. सोयाबीनसारखी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. अतिवृष्टी, जमीन वाहून जाणं, शेतकऱ्यांचं नुकसान असं सगळं झालं आहे. आता शेतकरी नुकसान भरपाई मिळण्याची वाट पाहतो आहे. देवाभाऊंनी या सगळ्याकडे अधिक लक्ष द्यावं असं शरद पवारांनी म्हटलं आहे.