Manikrao Kokate: मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विधानसभेत मोबाईलवर रमी खेळल्याचा आरोप झाल्यानंतर अखेर त्यांच्या खात्यात बदल करण्यात आला आहे. कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर भरणे यांच्याकडे असलेले क्रीडा व युवक कल्याण खाते आता कोकाटे यांच्याकडे देण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशन सुरू असताना कोकाटे विधानसभेत मोबाईलवर रमी खेळत असल्याचा एक व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. या प्रकारावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती आणि कोकाटे यांचा राजीनामा मागितला होता. मात्र राजीनामा न घेता त्यांचं खाते बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधीही माणिकराव कोकाटे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले होते. या घटनेने मंत्रिमंडळातील शिस्त आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विरोधकांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोकाटे यांनी आपल्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले असले तरी व्हिडिओमुळे या वादाला उधाण आले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करत कोकाटे यांचं खाते बदलण्यात आलं आहे.
अंजली दमानियांनी सुद्धा यावर सडकून टीका केली आहे. 'माणिकराव कोकाटे आणि क्रीडा संबंध काय?' असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.