शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांसाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीयदृष्ट्यादेखील या दोन पक्षांमध्ये युती होण्याचे संकेत अनेकदा पक्ष कार्यकर्ते आणि त्यांच्या शुभचिंतकांनी दिले आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू कधी एकत्र येणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली होती. अखेर ती प्रतिक्षा संपली असून एका महत्त्वाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची युती झाली आहे.
आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. बेस्ट पतपेढीची ही निवडणूक 18 ऑगस्टला होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसेच्या मनसे कर्मचारी सेनेने एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. उत्कर्ष पॅनल नावाने त्यांची निवडणूक पत्रिका जारी केली आहे.
हेही वाचा : शिंदे त्यांच्या मालकाला भेटायला आले होते; दिल्लीतून उद्धव ठाकरेंची शिंदेंवर जोरदार टीका
बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी एकत्रीत पत्रक जारी करून ही माहिती दिली. यात त्यांनी म्हटलं की, बेस्ट उपक्रमाच्या कामगारांच्या पतपेढीची निवडणूक सोमवार 18 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर झालेली आहे. सोसायटी निवडणुकीत ज्या पॅनलची सत्ता असते, त्या कामगार संघटना बेस्ट उपक्रमात शक्तीशाली समजल्या जातात. महाराष्ट्रात सद्या ठाकरे ब्रँड चर्चेत आहे. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आणि मराठी अस्मितेचा स्वाभिमान असलेले दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास महापालिकेसह महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकतील, अशी सर्वसामान्यांची भावना आहे.
बेस्ट पतपेढीमध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्या बेस्ट कामगार सेनेची सत्ता आहे. मागील नऊ वर्षाच्या कालावधीत बेस्ट कामगार सेनेच्या संचालक मंडळाने केलेल्या कामगार कल्याणकारी कामामुळे कामगारांचा प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्यामुळे अजून ताकद वाढली आहे, याचा पतपेढीच्या निवडणुकीत सकारात्मक परिणाम होणार यांत शंका नाही, अशी प्रतिक्रिया सेना-मनसेतून येत आहे.