बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एनडीए आणि इंडिया आघाडीकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून ‘मिशन 225+’चे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. तसेच काँग्रेसकडूनही विविध योजनांची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर असताना नव्या मतदार याद्या तयार करण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे, त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे.
राजकीय वातावरण तापत असताना काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आज पाटणा येथे राज्यव्यापी आंदोलन करत आहे. मतदार यादीची पुनर्पडताळणी या आंदोलनातील प्रमुख मुद्दा असल्याचे विरोधकांनी सांगितले आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सघन पुनरावृत्ती (एसआयआर) प्रक्रियेचा उद्देश भेदभावपूर्ण आणि उपेक्षित समुदायांना मतदानापासून वंचित ठेवणे आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. इंडिया आघाडीच्या आंदोलनात कोणकोणत्या मुद्द्यांचा निषेध केला जातोय, त्याविषयी जाणून घेऊयात.
राहुल गांधींकडून ‘चक्का जाम’ आंदोलनाचे नेतृत्व:
- लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आज बिहारमध्ये सुरू असलेल्या राज्यव्यापी निषेधाचे नेतृत्व पाटण्यातून करत आहेत.
- आज सकाळी 10 वाजता या आंदोलनाची सुरुवात झाली आहे.
- बिहार विधानसभेजवळील आयकर चौकापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
- गेल्या पाच महिन्यांत राहुल गांधी यांचा बिहारमधील हा सातवा दौरा आहे.
मतदार यादी पुनर्रचनेत कथित पक्षपातीपणाचा निषेध:
काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष म्हणजेच आरजेडी आणि डावे पक्ष विशेष सघन पुनरावृत्ती प्रक्रियेचा विरोध करण्यासाठी राज्यात ‘चक्का जाम’ आंदोलन करत आहेत. त्यांचा आरोप आहे की, ही प्रक्रिया गरीब, स्थलांतरित आणि उपेक्षित समुदायांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. बिहार काँग्रेसचे प्रमुख राजेश राम म्हणाले, 'हा गरिबांच्या मतदानाच्या अधिकारावर थेट हल्ला आहे.'