Sunday, August 31, 2025 02:18:11 PM

पाशवी बहुमत असूनही रायगडला पालकमंत्री नाही; राजू शेट्टींची टीका

जनतेचा भ्रमनिरास; सरकार अधिकाऱ्यांच्या बदल्यांपुरतं मर्यादित – शेट्टी

पाशवी बहुमत असूनही रायगडला पालकमंत्री नाही राजू शेट्टींची टीका

सरकारला प्रशासनावर पकड बसवता आली नाही – राजू शेट्टी

रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, "विक्रमी आणि पाशवी बहुमत मिळूनही सरकारला एका जिल्ह्याचा पालकमंत्री ठरवता येत नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. यावरूनच सरकार किती अस्थिर आहे, हे दिसून येते."

राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या कार्यशैलीवर सवाल उपस्थित करत म्हटले की, "या सरकारकडे बहुमत असलं तरी ते बेगडी आहे. सरकारला प्रशासनावर आपली पकड बसवता आलेली नाही. त्यांच्या कामकाजाचा केंद्रबिंदू केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे एवढाच राहिलेला आहे. त्यामुळे विकासाच्या आघाडीवर सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे."

राजू शेट्टी पुढे म्हणाले की, "जनतेने सरकारला जो कौल दिला, त्याचा भ्रमनिरास झालाय. अपेक्षित काम काहीच होत नाहीये. लोकप्रतिनिधी निवडताना जसा आपण जावई निवडताना चोखंदळपणा दाखवतो, तसा विचार करायला हवा."

रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील अंतर्गत मतभेद समोर आले असून, अजूनही या पदावर कोणाची नियुक्ती होणार याबाबत निश्चितता नाही. राजू शेट्टी यांच्या या टीकेनंतर महायुतीतील नेते यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे लक्ष लागले आहे.
👉👉 हे देखील वाचा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साता समुद्रापार लंडनमध्ये साजरी


सम्बन्धित सामग्री