Raj Thackeray Warns BJP MP Dubey: महाराष्ट्राच्या अस्मितेवर होत असलेल्या वारांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा तीव्र भाष्य करत भाजप खासदार निशिकांत दुबे यांना थेट इशारा दिला आहे. मिरा भाईंदर येथे आयोजित सभेत मराठी जनतेला उद्देशून भाषण करताना राज ठाकरेंनी निशिकांत दुबेच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला.
राज ठाकरे म्हणाले, 'दुबे नावाचा भाजप खासदार म्हणतो, आम्ही मराठी लोकांना पटकून पटकून मारू. त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली का? हिंदी चॅनेलवर त्याचं वक्तव्य दाखवलं का? काहीच नाही. आम्हाला मारणार म्हणतोस? दुबे, मुंबईत ये... समंदरात डुबे-डुबे कर मारू!' अशा थेट शब्दांत त्यांनी दुबेवर निशाणा साधला.
हेही वाचा: हिंदी सक्ती केली, तर दुकानेच नव्हे शाळाही बंद करून दाखवेन; राज ठाकरेंचा फडणवीसांना थेट इशारा
हिंदी चॅनेल आणि सत्ताधाऱ्यांवरही सडकून टीका
राज ठाकरेंनी हिंदी चॅनेलवर टीका करताना म्हटलं, 'हिंदी चॅनेलवाल्यांना महाराष्ट्रात काही झालं की लगेच दाखवायला मिळतं. पण बिहारमध्ये आजही 99 टक्के लोक मातृभाषा बोलतात, हिंदी नाही. मराठी भाषेचा इतिहास समजून घ्या. माझं हिंदी इथल्या नेत्यांपेक्षा चांगलंच आहे, पण कुठल्याही भाषेला मी विरोध करत नाही. मात्र ती आमच्यावर लादण्याचा प्रयत्न झाला तर कधीच सहन करणार नाही.'
हिंदुत्वाच्या नावाखाली मराठीचा षडयंत्र?
राज ठाकरे म्हणाले, 'हिंदुत्वाच्या बुरख्याखाली जर तुम्ही मराठी माणसाला संपवण्याचा डाव आखत असाल, तर माझ्यासारखा सरळसोट मराठी माणूस तुम्हाला सापडणार नाही. मीरा भाईंदर ते पालघर हे मतदारसंघ अमराठी करण्याचा डाव रचला जातोय. ही फक्त लोकं नाही, तर मतदारसंघ बनावट आहेत. उद्या याच मतदारसंघातून खासदार, आमदार, महापौर आणले जातील आणि अख्खा पट्टा गुजरातकडे वळवण्याचा डाव आहे.'
मराठी जनतेला जागं करण्याचा प्रयत्न करत राज ठाकरे म्हणाले, 'हे षडयंत्र समजून घ्या. हा सहज आलेला माज नाही. हा माज कुठून आला आहे ते ओळखा. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं. हिंदी प्रांतावर सत्ता मिळवायची होती, पण हिंदी भाषिक लोकांनी इथे येऊन सत्ता स्थापन करावी असं नव्हतं.'
राज ठाकरेंच्या या भाषणामुळे महाराष्ट्राच्या भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा गाजतोय. भाजप खासदाराच्या वक्तव्यावरून भडकल्यानंतर त्यांनी दिलेला इशारा राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरतो आहे. हिंदी सक्ती, मराठी अस्मिता आणि मतदारसंघांच्या बदलत्या गणितावर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली ठाम भूमिका स्पष्ट करत मनसेच्या आंदोलनाचा सूर लावला आहे.