मुंबई: संजय राऊत हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. कोणत्याही राजकीय घडामोडींवर परखडपणे भाष्य करणारे राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या ऑफरवर भाष्य करताना पुन्हा एकदा फडणवीसांना टोला लगावला आहे. त्यांच्या मते, फडणवीस यांची ही ऑफर म्हणजे केवळ टपल्या, टिचक्या आणि टोमण्यांचा भाग आहे.
फडणवीसांच्या ऑफरवर राऊतांचा टोला
संजय राऊत म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस अशा प्रकारच्या टपल्या, टिचक्या, टोमणे मारण्यात पटाईत आहेत. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेली ऑफरही एखादी टपली किंवा टोमणा आहे, त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही.'
शिवसेना सध्या सर्वोच्च न्यायालयात आपले नाव आणि चिन्ह यासाठी लढा देत आहे आणि न्यायालयातून आम्हाला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. फडणवीस यांच्याबरोबर सध्या डुप्लिकेट लोक बसले आहेत आणि त्यांना शिवसेना म्हणून मान्य करण्याचा अधिकार फडणवीस यांना नाही, असेही राऊत म्हणाले.
'सध्या डुप्लिकेट राष्ट्रवादी आणि डुप्लिकेट शिवसेना यांच्यासोबत फडणवीस सत्ता भोगत आहेत. त्यामुळे त्यांच्या ऑफरकडे आम्ही अजिबात गांभीर्याने पाहत नाही. ही ऑफर नाहीच, हे केवळ टपल्या आणि टिचक्याच आहेत,' असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा:ठाकरेंनी शिंदेंना मांडीवर घेऊन बसायला हवं होतं का?; राऊतांचा खोचक टोला
राजकारणाचे चंचल स्वरूप
राजकारण आणि बहुमत हे फार चंचल असते, असे मत राऊत यांनी मांडले. 'लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे की, राजकारणात उद्या काय होईल हे सांगता येत नाही. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असताना आम्हाला वाटले होते की, ते दहशतवाद्यांविरोधात कठोर भूमिका घेतील. मात्र, आज त्या मुद्द्यावर आवाज बंद आहे. म्हणूनच राजकारणात काहीही घडू शकते,' असे राऊत म्हणाले.
या विधानांमुळे फडणवीसांच्या ऑफरवरुन पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.