नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकमत झाल्याने एकाच व्यासपीठावर आलेल्या या बंधूंचा पक्षही आगामी महापालिका निवडणुका एकत्रित लढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याचदरम्यानस सेना आणि मनसेनं बेस्टची निवडणूक एकत्र लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही बंधूंनी मात्र युतीबाबत अद्याप थेट भाष्य केले नसले तरी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत वारंवार शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीवर बोलत आहेत.
हेही वाचा : इतिहासात पहिल्यांदाच स्वातंत्र्य सैनिकाच्या हस्ते पालकमंत्री कार्यालयाचं उद्घाटन
संजय राऊत यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीबाबत सांगितले की, मुंबईसह, ठाणे, नाशिक, कल्याण, छत्रपती संभाजीनगर अशा सर्व ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र निवडणुका जिंकतील. या सर्व महानगरपालिकांवर आमची चर्चा सुरू आहे. आता कोणतीही अघोरीशक्ती आली तरी मराठी माणसाची वज्रमुठ तोडू शकत नाही, अशी प्रतिक्रिया नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. तसेच मनसेसोबतच्या युतीबाबत आमची अद्यापही चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिनी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर दोन्ही बंधू निवडणुकीत एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपने टीका केली आहे. 'उतवळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग' अशी ठाकरे गटाची अवस्था झाली असल्याचे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले. राज ठाकरेंसोबत युती न केल्यास आपल्या पक्षाचे अस्तित्व संपून जाईल, अशी भीती राऊत यांना वाटत आहे. त्यामुळेच राऊत यांना वाटत असल्याचे दरेकर यांनी नमूद केले.