Wednesday, August 20, 2025 09:26:40 AM

Honey Trap: राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी, माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात?

राज्यात 72 वरिष्ठ अधिकारी व माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा खळबळजनक दावा; नाशिकमधील हॉटेलमध्ये व्हिडीओ तयार, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ.

 honey trap राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात एक मोठा भूकंप घडवणारा खळबळजनक दावा नुकताच समोर आला आहे. राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा आरोप एका राजकीय नेत्याने केला आहे. या दाव्यामुळे संपूर्ण राज्यात आणि विशेषतः राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे.

सध्या नाशिक दौऱ्यावर असलेल्या या राजकीय नेत्याने पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना हा धक्कादायक गौप्यस्फोट केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्यांमध्ये नाशिकमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, याबाबत काही व्हिडीओ देखील तयार करण्यात आले असून, ते हनी ट्रॅपचा भाग आहेत की केवळ गैरवर्तनाचे पुरावे, याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही.

हेही वाचा: प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी दीपक काटेला दोन दिवसांची पोलीस कोठडी

ही घटना नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडल्याचे समोर आले आहे. संबंधित प्रकरणाबाबत मुंबई नाका पोलिस ठाण्यात एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. मात्र, यात उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकीय नेत्यांची नावे असल्यामुळे कोणीही उघडपणे समोर येण्यास तयार नसल्याने हे प्रकरण सध्या गुलदस्त्यात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा थेट संबंध केवळ नाशिकपुरता मर्यादित नसून, मुंबई आणि पुण्यातील बड्या अधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचाही यात सहभाग असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ स्थानिक नव्हे तर राज्यस्तरीय स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा: वैष्णवी हगवणे प्रकरणात दोषारोपपत्र दाखल; दोषारोपपत्रात एकूण 11 जण आरोपी

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना हे प्रकरण उजेडात आल्याने, त्याचा राजकीय परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. विधिमंडळात विरोधक या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची शक्यता आहे. यासंदर्भात विरोधी पक्षांच्या हालचालीही वाढल्या आहेत.

हनी ट्रॅप प्रकरणे ही सामान्यतः उच्चपदस्थ व्यक्तींना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी किंवा आर्थिक फायद्यासाठी केली जातात. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सखोल आणि पारदर्शक व्हावा, अशी मागणीही आता होऊ लागली आहे. सध्या पोलिस तपास सुरु असून, या प्रकरणातील खरी तथ्ये पुढे येण्याची प्रतीक्षा राज्यवासीयांना लागली आहे. येत्या काही दिवसांत या हनी ट्रॅप प्रकरणात कोणते नवे खुलासे होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री