रत्नागिरी: उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागत आहे. अशातच, काही जवळच्या सहकाऱ्यांनी आमदार भास्कर जाधव यांना सोडून नवा राजकीय मार्ग स्वीकारला आहे. यावर, जाधव यांनी आपल्या मनात साचलेल्या भावना व्यक्त करत मतदारसंघातील जनतेशी संवाद साधला. यासह, साथ सोडणाऱ्या कार्यकर्त्यांवरही आमदार भास्कर जाधवांनी टीकेचा वर्षाव केला. यावेळी, भास्कर जाधव यांनी मतदारसंघातील नागरिकांना पत्र लिहिले, ज्यात ते म्हणाले की, 'लवकरच गावी आणि मुंबईला जाहीर मिळावे घेणार आहे. तेव्हा भेटू आणि खूप काही बोलू'.
हेही वाचा: बीडीडी चाळधारकांना घराचा ताबा द्या, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
काय म्हणाले भास्कर जाधव?
'मित्रांनो, मी पण माणूस आहे, मला पण मन आहे. वेदना होतात मनाला. राजकारण कसे करायचे हे मला कोणी शिकवण्याची गरज नाही. गेल्या 40 वर्षांपासून मी राजकारणात आहे. एक गेला तर चार निर्माण करेन. मात्र, मी आक्रमक असलो तरी अत्यंत संवेदनशील आहे. इतक्या वर्षांपासून जपलेली माणसं जेव्हा घर सोडून जातात, तेव्हा दु:ख तर होणारच ना? जे सोडून गेले आहेत ते आता इतर सर्वांना फोन करून सांगत आहेत की ते विकासासाठी गेले आहेत, तुम्हीही आमच्यासोबत या. परंतु थांबा, घाई करू नका. यापूर्वी जे कोणी पक्ष सोडून गेले त्यांनी विकासकामासाठी किती निधी आणले आणि कोणता विकास केला? या गोष्टी जरा तपासून बघा', असं भास्कर जाधव म्हणाले.
पुढे भास्कर जाधव म्हणाले की, 'आता जे गेले आहेत, ते विकासकामासाठी किती निधी आणतील? नक्की कोणता आणि कोणाचा विकास करणार आहेत? हेही जरा अनुभवा आणि पाहा. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, कोणत्याही भूलपाथांना बळी पडू नका आणि त्यांच्या खोटेपणाच्या नादी लागू नका'.