मुंबई: विधिमंडळाच्या कामकाजादरम्यान अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. अनिल परब यांच्याकडून शंभूराज देसाईंचा गद्दार असा उल्लेख करण्यात आला. यानंतर त्यांच्यातील वाद पेटला. परबांच्या आरोपांना शंभूराज देसाई यांनी प्रत्यारोप केला आहे. गद्दार कुणाला बोलतो? बाहेर ये तुला दाखवतो असे त्यांनी म्हटले आहे.
आज पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजावेळी अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यात आरोप- प्रत्यारोप पाहायला मिळाले. अनिल परबांनी शंभूराज देसाईंचा गद्दार असा उल्लेख केला. यानंतर देसाई भडकले आणि गद्दार कुणाला बोलतो? बाहेर ये तुला दाखवतो असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar: गणवेश कमिशन प्रकरणातील 'त्या' शिक्षकाची झालेली चौकशी गुलदस्त्यात
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी काय म्हटलं?
शंभूराज देसाई म्हणाले, "विधान परिषदेच्या प्रश्नोत्तराच्या तासाला मिलिंद नार्वेकर यांनी एक प्रश्न विचारला होता. मराठी माणसाला घरं उपलब्ध करुन देण्यासंबंधीची ही चर्चा होती. मी दिलेल्या उत्तराने नार्वेकर समाधानी होते. उपप्रश्न चित्रा वाघ यांनी केला. चित्रा वाघ म्हणाल्या या आधीच्या सरकारमध्ये असं धोरणं होतं का? त्यावर उत्तर देताना या आधीच्या मविआ सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठी भाषिक लोकांच्या घरांसंदर्भातील धोरण आणलं नव्हतं. मी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केल्यानंतर अनिल परब यांना राग आला. त्यानंतर ते जोरजोरात तुम्ही पण मंत्री होता. तुम्ही का बोलला नाहीत? असा प्रश्न विचारु लागले. मी त्यांना म्हणालो तुम्ही तर तुम्ही तर कॅबिनेट मंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचे होता. मग तुम्ही का बोलला नाहीत. आम्ही हे बोलताना अनिल परब चिडले आणि तुम्ही तर गद्दारी करत होतात असा शब्द वापरला. त्यामुळे मी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. तुम्ही तिथे काय चाटायचा प्रयत्न करत होतात? आम्हाला गद्दार शब्द वापरल्याने वाद झाला. "
'...मी पण तशीच भाषा वापरली'
शंभूराज देसाई यांनी म्हटले की ते अरे कारे करु लागले मी पण तशीच भाषा वापरली. अनिल परब बघतो म्हणाले, मी पण तेच म्हणालो यापेक्षा अधिक काहीही घडलं नाही. त्यांनी जर वाद वाढवला तर दुप्पट वाद वाढवायची आमची तयारी आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला आरे ला कारे नेच उत्तर द्यायचं शिकवलं आहे असं मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.