Bail Pola 2025: बैल पोळा हा श्रावण अमावस्येला साजरा केला जातो. श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांची पूजा करतो. त्यालाच बैल पोळा म्हणतात. यंदा बैल पोळा शनिवारी, 22 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जाणार आहे.
बैल पोळा कसा साजरा केला जातो?
बैल पोळा हा सण प्रामुख्याने विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इत्यादी भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बैलांना आराम देतात, त्यांच्याकडून शेतातील कोणतीही काम करुन घेतली जात नाही. सकाळी उठून त्यांना नदीवर नेऊन, साबणाने स्वच्छ अंघोळ घातली जाते. मग त्याच्या पाठीवर रंगाचे हाताचे ठसे, शिंगांना फुगे, बाशिंगे, बेगडी कागदी पट्ट्या, रिबीनी बांधल्या जातात. गळ्यात घुंगरु, घंटा, मणी-माळा, कवड्या, गोफ, अंगावर रंगीबेरंगी कापडांचे आरसे लावलेली झूल, गोंडे, रंगीत कासरे अशी सजावट होते.
हेही वाचा: Today's Horoscope : 'या' राशीच्या लोकांना नव्या संकल्पना देतील आर्थिक यश; जाणून घ्या
यानंतर धूप, दीप लावून पूजा करतात. यावेळी पायावर दूध, पाणी घालून, आरती ओवाळून त्यांना पुरणपोळ्यांचा प्रसाद दिला जातो. शिवाय बाजरी-घुगऱ्या, कडबा, चारा, हिरवे गवत, सरकी, भिजवलेले आंबोळ, अनेक धान्यांची केलेली खिचडी, कोंड्याचे मुटके इ. देतात. मग पळण्याची स्पर्धा, बैलांची मिरवणूक, असा रितीने बैलपोळा साजरा केला जातो. काही ठिकाणी पळवत नेत असताना धष्ट-पुष्ट बैलांकडून उंच उडी मारून तोरण तोडण्याची रीत आहे. ती पाहण्यासारखी असते. तोरण तोडणाऱ्या बैलाला बक्षीस मिळते. त्याची वाजत-गाजत मिरवणूक निघते.
बैलपाळा का साजरा केला जातो?
प्रचलित कथांनुसार, द्वापर युगात कंसाने भगवान श्रीकृष्णाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु तो या कार्यात यशस्वी होऊ शकला नाही. तेव्हा कंसाने पोलासुर नावाच्या राक्षसाला श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवले. पोलासुराने बैलाचे रूप धारण केले आणि ते प्राण्यांमध्ये सामील झाले. श्रीकृष्णाने त्याला प्राण्यांच्या कळपातही ओळखले आणि त्याचा वध केला. तेव्हापासून बैल पोळा हा सण साजरा केला जातो.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)