Monday, September 01, 2025 09:30:25 AM

Hartalika Vrat 2025: अशाप्रकारे करा हरतालिकेचे व्रत, पतीसाठी लाभदायक आणि कुमारिकांसाठी वरदान

हरतालिका व्रत 2025 हे भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी 26 ऑगस्ट रोजी साजरे होणार आहे. स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका इच्छित वरासाठी हे व्रत करतात. पूजा व कथा याला विशेष महत्त्व आहे.

hartalika vrat 2025 अशाप्रकारे करा हरतालिकेचे व्रत पतीसाठी लाभदायक आणि कुमारिकांसाठी वरदान

Hartalika Vrat 2025: हिंदू धर्मातील प्रमुख व्रतांपैकी हरतालिका व्रत हे एक महत्त्वाचे व्रत मानले जाते. महाराष्ट्रासह उत्तर भारत, मध्य भारत आणि इतर अनेक राज्यांमध्ये या व्रताला विशेष महत्त्व दिले जाते. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्य व मंगलमय आयुष्यासाठी आणि कुमारिका मुली इच्छित वर मिळावा यासाठी हरतालिकेचे व्रत करतात. या वर्षी हरतालिका व्रत 26 ऑगस्ट 2025 रोजी साजरे करण्यात येणार आहे.

हरतालिका तिथी व कालावधी

पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हे व्रत येते. तृतीया तिथीची सुरुवात 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12:34 वाजता होईल तर समाप्ती 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1:54 वाजता होईल. उदय तिथी मंगळवार, 26 ऑगस्ट असल्याने महिलावर्ग या दिवशी उपवास, पूजन आणि कथा वाचन करणार आहेत.

हेही वाचा: Hartalika Vrat 2025: हरतालिका व्रत कोणी करावे आणि कोणी करू नये? जाणून घ्या योग्य पूजा विधी आणि नियम

 

पूजेचा शुभ मुहूर्त

या वर्षी हरतालिकेच्या पूजेचा सर्वाधिक शुभ वेळ पहाटे 5:56 मिनिटांपासून सकाळी 8:31 मिनिटांपर्यंत आहे. हा कालावधी दोन तास 35 मिनिटांचा असून, याच काळात देवी पार्वती आणि भगवान शिवाची आराधना केली जाणे अत्यंत मंगलकारी मानले जाते.

व्रताचे महत्त्व व पूजा पद्धती

हरतालिका व्रताचे मूळ महत्त्व देवी पार्वतीच्या तपश्चर्येशी जोडलेले आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार, पार्वतीजींना भगवान शिवच पती म्हणून हवेत अशी तीव्र इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आपल्या सखीसमवेत जंगलात जाऊन हे व्रत केले. त्यांचा दृढ संकल्प पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि नंतर त्यांचा विवाह पार्वतीसोबत झाला.

'हर' म्हणजे अपहरण करणे आणि “तालिका” म्हणजे सखी. असे मानले जाते की, पार्वतीला त्यांच्या सखीने घरी न ठेवता जंगलात नेले आणि तेथेच त्यांनी हे व्रत सुरू केले. त्यामुळे या व्रताला हरतालिका असे नाव मिळाले.

या व्रतामुळे विवाहित महिलांना वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी लाभते. तर अविवाहित कुमारिकांना योग्य जोडीदार मिळतो, असे मानले जाते.

हेही वाचा: Hartalika Vrat 2025: हरतालिका व्रत म्हणजे काय? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व

व्रताची विधी

सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे.

घर व देवघराची स्वच्छता करून भगवान शिव व देवी पार्वतीची मूर्ती किंवा शिवलिंगाची स्थापना करावी.

फुले, बेलपत्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करून पूजा करावी.

हरतालिका व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी.

या दिवशी महिलांनी दिवसभर उपवास करावा. परंपरेनुसार, हे व्रत फक्त फळे खाऊन केले जाते.

'गौरी मे प्रीयतां नित्यं अघनाशाय मंगला। सौभाग्यायास्तु ललिता भवानी सर्वसिद्धये।।' हा मंत्र जपावा.

दुसऱ्या दिवशी स्नान करून पूजन केल्यानंतर व्रत सोडले जाते.

हरतालिका आरती

जय देवी हरितालिके।
सखी पार्वती अंबिके ॥
आरती ओवाळीते ।
ज्ञानदीप कळिके ॥ धृ ॥

हर अर्धांगी वससी ।
जासी यज्ञा माहेरासी ॥
तेथे अपमान पावसी ।
यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय. 1॥

रिघसी हिमाद्रिच्या पोटी ।
कन्या होसी तूं गोमटी ॥
उग्र तपश्चर्या मोठी।
आचरसी उठाउठी ॥ जय.॥ 2॥

तपपंचाग्निसाधने ।
धुम्रपाने अघोवदने ।
केली बहु उपोषणे ॥
शुंभ भ्रताराकारणें ॥जय. ॥ 3 ॥

लीला दाखविसी दृष्टी ।
हे व्रत करिसी लोकांसाठी ॥
पुन्हा वरिसी धूर्जटी ।
मज रक्षावे संकटी ॥ जय. ॥ 4॥

काय वर्णू तव गुण ।
अल्पमती नारायण ॥
माते दाखवी चरण ।
चुकवावे जन्म मरण ॥ जय देवी ॥ 5 ॥

विशेष श्रद्धा

असे मानले जाते की, श्रद्धेने केलेले हे व्रत स्त्रियांना चिरंतन सौभाग्य आणि कौटुंबिक सुख प्रदान करते. तर कुमारिकांच्या जीवनात योग्य पती येण्याचा आशीर्वाद मिळतो. म्हणूनच, आजही लाखो स्त्रिया हरतालिकेचे व्रत अतिशय भक्तिभावाने करतात.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)
 


सम्बन्धित सामग्री