Sunday, August 31, 2025 08:55:46 AM

Hartalika Vrat 2025: हरतालिका व्रत म्हणजे काय? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व

हरतालिका व्रत 2025 हा भाद्रपद शुक्ल तृतीयेचा पवित्र दिवस आहे. या दिवशी महिला शिव-पार्वतीची पूजा करून उपवास करतात. पतीचे दीर्घायुष्य, वैवाहिक सुख आणि अविवाहितांना योग्य जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत के

hartalika vrat 2025 हरतालिका व्रत म्हणजे काय जाणून घ्या शुभ मुहूर्त पूजेची पद्धत आणि महत्त्व

Hartalika Vrat 2025: भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी हा दिवस हिंदू धर्मीय स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी केले जाणारे हरतालिका व्रत हे पतीच्या दीर्घायुष्य, वैवाहिक सुख-समृद्धी आणि अविवाहित मुलींना योग्य जोडीदार मिळावा यासाठी पाळले जाते. महाराष्ट्रासह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरे केले जाते.

हरतालिका व्रत 2025 तिथी व मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार, 2025 साली भाद्रपद शुक्ल तृतीया तिथी 25 ऑगस्ट दुपारी 12:34 वाजता सुरू होईल आणि 26 ऑगस्ट दुपारी 1:54 वाजता समाप्त होईल. उदय तिथीचा विचार करता, मंगळवार, 26 ऑगस्ट 2025 रोजी हरतालिका व्रत साजरे केले जाईल.
या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5:56 ते सकाळी 8:31 असा असेल. म्हणजेच दोन तास 35 मिनिटांचा कालावधी हरतालिका पूजेसाठी विशेष मंगलकारी मानला जाईल.

हेही वाचा: Pithori Amavasya 2025: पिठोरी अमावस्या म्हणजे काय?,मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या


व्रताची पद्धत

या दिवशी महिलांनी पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ व शुभ्र वस्त्रे परिधान करावी. घराची स्वच्छता करून देवघर सजवले जाते. त्यानंतर हरतालिकेच्या गौरी मूर्तीची तसेच शिवलिंगाची स्थापना करून विधिपूर्वक पूजा केली जाते. या पूजेत फुले, फळे, नैवेद्य अर्पण करून हरितालिका व्रत कथा ऐकली किंवा वाचली जाते. शिव-पार्वतीच्या आराधनेदरम्यान 'गौरी मे प्रीयतां नित्यं अघनाशाय मंगला। सौभाग्यायास्तु ललिता भवानी सर्वसिद्धये ।।' या मंत्राचा जप करणं अत्यंत फलदायी मानलं जातं.

व्रत करणाऱ्या महिला दिवसभर अन्नत्याग करून फक्त फळाहार किंवा निर्जल उपवास करतात. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पूजा करून व्रत सोडले जाते.

हरतालिका व्रताची पौराणिक कथा

पौराणिक आख्यायिकेनुसार, देवी पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली होती. मात्र त्यांच्या वडिलांनी इतरत्र विवाह ठरवल्याने पार्वती चिंतेत होती. त्या वेळी त्यांच्या सखीनं त्यांना जंगलात नेऊन व्रत करण्यास प्रवृत्त केलं. पार्वतीनं हरतालिकेचे व्रत अंगीकारलं आणि अखेरीस भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यानंतर शंकर-पार्वतीचा विवाह पार पडला.
‘हर’ म्हणजे अपहरण करणारी सखी आणि ‘तालिका’ म्हणजे सोबती, या शब्दांवरून या व्रताला हरतालिका असे नाव मिळाले.

हेही वाचा: Surya Grahan 2025: वर्षाचे शेवटचे सूर्य ग्रहण; 'या' तीन राशींनी जरा जपूनच राहावे; जाणून घ्या

व्रताचे महत्त्व

या व्रतामुळे विवाहित स्त्रियांच्या वैवाहिक जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी येते, असा समज आहे. अविवाहित मुलींना इच्छित जोडीदार मिळतो. देवी पार्वतीप्रमाणे अखंड सौभाग्य, आयुष्य आणि मंगलकारी गृहस्थजीवन लाभावे, या श्रद्धेने महिलांनी हे व्रत करणे परंपरेत आले आहे.

हरतालिका व्रत हा केवळ धार्मिक विधी नसून स्त्रीशक्तीच्या दृढ निश्चयाचे प्रतीक आहे. देवी पार्वतीप्रमाणे भक्तिभाव, संयम आणि श्रद्धेने केलेले हे व्रत नक्कीच फलदायी ठरते. त्यामुळे 2025 मध्ये येणाऱ्या या पावन दिवशी सर्व महिलांनी हरतालिकेचे व्रत मोठ्या भक्तीभावाने साजरे करावे.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)
 


सम्बन्धित सामग्री