Wednesday, August 20, 2025 12:47:16 PM

Mangalagauri vrat 2025: मंगळागौरी व्रत म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या योग्य पूजा विधी आणि महत्वाची माहिती

मंगळागौरी व्रत आज साजरे होणार असून नवविवाहित व विवाहित महिलांसाठी हे सौभाग्य, श्रद्धा व समर्पणाचं प्रतीक मानलं जातं. पारंपरिक विधी, कथा व सांस्कृतिक उत्सवांनी परिपूर्ण असा भक्तिपूर्ण सण

mangalagauri vrat 2025 मंगळागौरी व्रत म्हणजे नेमकं काय जाणून घ्या योग्य पूजा विधी आणि महत्वाची माहिती

Mangalagauri vrat 2025: श्रावण महिना म्हणजे भक्तिभाव, उपासना आणि सणांची रंगत. या महिन्यात मंगळवारी येणारा मंगळागौरी व्रताचा दिवस नवविवाहित तसेच विवाहित स्त्रियांना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 2025 मध्ये पहिली मंगळागौर 29 जुलै रोजी म्हणजेच आज आहे, अनेक घरांमध्ये साजऱ्या होणाऱ्या या पूजेला भक्तीचा आणि पारंपरिक उत्साहाचा सोहळा लाभतो. केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर कौटुंबिक स्नेह, सांस्कृतिक समृद्धी आणि महिलांच्या श्रद्धेचा उत्कट अनुभव म्हणजे मंगळागौरी व्रत.

मंगळागौरी व्रत म्हणजे काय?

मंगळागौरी व्रत हे देवी पार्वतीच्या स्वरूपातल्या गौरीमातेची उपासना आहे. हिंदू संस्कृतीत देवी गौरी ही सौंदर्य, समृद्धी आणि स्त्रीसौभाग्याचं प्रतीक मानली जाते. नवविवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व सुखी संसारासाठी हे व्रत करतात. विशेषतः लग्नानंतर पहिल्या पाच वर्षांपर्यंत हे व्रत करणं शुभ मानलं जातं, त्यातील पहिलं व्रत माहेरी आणि उरलेली चार व्रते सासरी केली जातात.

सांस्कृतिक आणि धार्मिक अर्थहे व्रत म्हणजे स्त्रीच्या श्रद्धा, समर्पण आणि शुचिता यांचं प्रतीक आहे. नवविवाहित स्त्रिया हे व्रत केल्याने त्यांच्या जीवनात स्थैर्य, प्रेम आणि आनंद नांदतो, अशी श्रद्धा आहे. पारंपरिक दृष्टिकोनातून हे व्रत म्हणजे देवी पार्वतीने भगवान शिवासाठी केलेल्या कठोर तपश्चर्येची आठवण आहे. जसे पार्वतीने श्रद्धा, धैर्य आणि भक्तीने आपले व्रत सिद्ध केले, तसेच प्रत्येक स्त्रीसाठी हे व्रत तिच्या संसाराच्या संरक्षणासाठी केलेली एक भक्तिपूर्ण अर्पण आहे.

हेही वाचा: Mars Transit: अखेर 'या' राशींची मंगळ-केतू युतीतून सुटका, आता होणार सुख-समृद्धीचा वर्षाव; जाणून घ्या

मंगळागौरीची पूजाविधी 

पूजेची तयारी:

पूजेसाठी चौरंग किंवा चौकोनी पाट सजवला जातो.त्यावर केळीचे खुंट बांधले जातात आणि फुलांनी मखर तयार केला जातो.रांगोळीने सजावट केली जाते.पूजेसाठी लागणारे साहित्य (फुले, पत्री, दिवे, नैवेद्य, पुरणाचे अलंकार) आधीच तयार ठेवले जाते.

पूजाविधीतील खास वैशिष्ट्ये:

गौरीसह शिव आणि गणपतीची पूजा केली जाते. पूजा करताना सोळा प्रकारची फुले, सोळा प्रकारची पत्री आणि सोळा पुरणाचे दिवे वापरले जातात. पुरणाच्या साहाय्याने हार, दागिने, गजरा, फणी यांसारखे अलंकार तयार केले जातात आणि ते गौरीमातेवर अर्पण केले जातात. पूजेमध्ये अंगपूजा, पत्रीपूजा आणि पुष्पपूजांचा समावेश असतो.आरतीनंतर पूजेची पौराणिक कथा वाचन केले जाते.

मंगळागौरी व्रत कथा

व्रतामागील कथा एक अपत्यहीन दांपत्याची आहे. त्यांच्या समोर एक संत पुन्हा पुन्हा भिक्षा मागायला येतो पण अपत्य नसल्यामुळे त्यांच्याकडून भिक्षा घेण्यास नकार देतो. शेवटी, त्या स्त्रीच्या श्रद्धेमुळे संत प्रसन्न होतो आणि देवी पार्वतीची कृपा मिळवण्याचा उपाय सांगतो.

त्या उपायामुळे त्या स्त्रीला एक अल्पायुषी पण गुणी मुलगा होतो. पुढे तो मोठा होतो आणि एका अशा मुलीशी लग्न करत, जिला तिच्या आईने मंगळागौरी व्रत शिकवलं असतं. तिच्या व्रतामुळे तिच्या पतीचं आयुष्य वाचतं आणि अखेर त्यांचा संसार पुन्हा एकत्र येतो.

ही कथा म्हणजे व्रताच्या श्रद्धेने संकट टळू शकते, हा महत्त्वाचा संदेश देते.

मौन आणि मन:शांती यांचं महत्त्व

या व्रतामध्ये एक वेगळी आणि अनोखी गोष्ट म्हणजे पूजेदरम्यान मौन पाळणं. पूजा सुरू झाल्यापासून ते जेवण होईपर्यंत स्त्रिया मौन ठेवतात. मौन हे केवळ नियम नाही, तर मनाचा एकाग्रपणा आणि श्रद्धेचा भाग आहे. मौनामुळे ध्यान अधिक प्रभावी होतं आणि पूजेला पूर्ण समर्पण मिळतं.

मंगळागौरीचा जागर 

रात्री मंगळागौरीचं जागरण म्हणजे स्त्रियांच्या हास्य-विनोदाचा आणि पारंपरिक खेळांचा उत्सव असतो.सोळा कडवातींची आरती केली जाते.फुगड्या, भेंड्या, गाणी, नृत्य, उखाणे आणि शिवगौरीचा महिमा गायला जातो. नवविवाहित मुलींसाठी ही संधी असते; आपल्या माहेरच्या आठवणी, मैत्रिणींसोबतची मजा आणि धार्मिक आनंद साजरा करण्याची. दुसऱ्या दिवशी, उत्तरपूजा करून देवीचं विसर्जन केलं जातं. विसर्जन हा भागही भक्तिपूर्ण वातावरणात पार पडतो.

विवाहित महिलांसाठीही हे व्रत फायदेशीरनवविवाहित स्त्रियांसाठी हे व्रत अनिवार्य मानलं जातं, पण विवाहित स्त्रियांनीही याचं पालन केल्यास सौभाग्य वृद्धिंगत होतं. संसारातील संकटांपासून वाचण्यासाठी आणि पतीचं रक्षण करण्यासाठी मंगळागौरीचा आशीर्वाद फार उपयोगी ठरतो, असं मानलं जातं.

हेही वाचा: Today's Horoscope: आजचा दिवस कोणासाठी ‘लकी’? जाणून घ्या 29 जुलैचं संपूर्ण राशीभविष्य

मंगळागौरीची आरती 

जय देवी मंगळागौरी ॥ ओवाळीन सोनियाताटी ॥ रत्नांचे दिवे ॥ माणिकांच्या वाती ॥ हिरेया मोती ज्योती ॥ ध्रु० ॥

मंगळमूर्ती उपजली कार्या ॥ प्रसन्न झाली अल्पायुषी ॥ राया तिष्ठली राजबाळी ॥ अहेवपण द्यावया ॥ जय ० ॥१॥

पूजेला ग आणिती जाईच्या कळ्या ॥ सोळा तिकटी सोळा दूर्वा ॥ सोळा परीची पत्री ॥ जाई जुई आबुल्या शेवंतू नागचांफे ॥ ध्रु० ॥

पारिजातकें मनोहरे ॥ गोकर्ण महाफुले ॥ नंदेटें तगरें ॥ पूजेला ग आणिली ॥ जय० ॥ २ ॥

साळीचे तांदूळ मुगाची डाळ ॥ अळणी खिचडी रांधिती नार ॥ आपुल्या पतीलागी सेवा करिती फार ॥ जय० ॥ ३ ॥

डुमडुमे डुमडुमे वाजंत्रे वाजती ॥ कळावी कांकणे हाती शोभाती ॥ शोभती बाजुबंद ॥ कानी कापांचे गबे ॥ ल्यायिली अंबा शोभे ॥ जय० ॥ ४ ॥

न्हाउनी माखुनी मौनी बैसली ॥ पाटावाची चोळी क्षीरोदक नेसली ॥ स्वच्छ बहुत होउनी ॥ अंबा पूजूं बैसली ॥ जय० ॥ ५ ॥

सोनियाचे ताटी ॥ घातिल्या आता ॥ नैवेद्य षड्रसपक्वान्ने ॥ ताटी भरा मोदे जय० ॥ ६ ॥

लवलाहे तिघे काशी निघाली ॥ माऊली मंगळागौरी भिजवू विसरली ॥ मागुती परतुनिया आली ॥

अंबा स्वयंभू देखिली ॥ देऊळ सोनियांचे ॥ खांब हिरेयांचे ॥ वरती कळस मोतियांचा ॥ जय० ॥ ७ ॥

ही पारंपरिक आरती भक्तिपूर्वक म्हणताना वातावरणात एक उर्जा निर्माण होते. देवीची स्तुती म्हणजे एक सकारात्मक शक्तीचा स्त्रोत आहे.

मंगळागौरी व्रत हा केवळ एक विधी नाही, तर भारतीय स्त्रियांच्या श्रद्धेचा, प्रेमाचा आणि समर्पणाचा महोत्सव आहे. देवी गौरी हे एक संपूर्ण स्त्रीत्त्वाचं आणि सहनशक्तीचं रूप आहे. तिची उपासना करून स्त्रिया केवळ पतीसाठीच नव्हे तर स्वतःसाठीही मानसिक शांतता, भक्ती आणि ऊर्जा मिळवतात. आजच्या धावपळीच्या युगातही या पारंपरिक व्रतांमुळे समाजात सांस्कृतिक सलोखा, एकत्र कुटुंब पद्धतीचा सन्मान आणि स्त्रीच्या श्रद्धेचं महत्त्व टिकून आहे.


सम्बन्धित सामग्री