Monday, September 01, 2025 04:59:48 AM

IND vs PAK : पाक ऑल आऊट! गोलंदाजांचं काम फत्ते, विजयासाठी 242 धावांची गरज

भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानचा डाव 241 धावांवर संपवला. भारताला विजयासाठी 242 धावा कराव्या लागणार आहेत.

ind vs pak  पाक ऑल आऊट गोलंदाजांचं काम फत्ते विजयासाठी 242 धावांची गरज
IND vs PAK : पाक ऑल आऊट! गोलंदाजांचं काम फत्ते, विजयासाठी 242 धावांची गरज

दुबई - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 'हायहोल्टेज' सामना आज दुबईत रंगला आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तेव्हा भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानचा डाव 241 धावांवर संपवला. मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांच्या शतकी भागीदारीनंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व गाजवत पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. भारताला विजयासाठी 242 धावा कराव्या लागणार आहेत.

नाणेफेक जिंकून पाकचा कर्णधार मोहम्मद रिजवान याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा पाकिस्तानने सावध सुरुवात केली. पण नवव्या षटकात हार्दिक पांड्याने बाबर आझमला के. एल. राहुलकरवी झेलबाद करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली. बाबरने 26 चेंडूत 23 धावा केल्या. अक्षर पटेलने इमाम उल हकची शिकार केली. त्याने त्याला धावबाद करत पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. पहिल्या 10 षटकांत पाकिस्तानने 52 धावा केल्या होत्या.

हेही वाचा - चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रलियाऐवजी वाजले भारतीय राष्ट्रगीत; जाणून घ्या घडलं काय?

सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांनी संयमी फलंदाजी करत 90 धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. 34व्या षटकात अक्षर पटेलने रिझवानला क्लीन बोल्ड करत पाकिस्तानला मोठा हादरा दिला. त्यानंतर 35व्या षटकात सौद शकीलही 50 धावांवर झेलबाद झाला. या दोन्ही फलंदाजांच्या विकेट्समुळे पाकिस्तानच्या धावगतीला ब्रेक लागला.

कुलदीप यादवने 43व्या षटकात सलमान अली आगा आणि शाहीन आफ्रिदीला लागोपाठ दोन चेंडूंवर बाद करत पाकिस्तानच्या आशा मावळवल्या. त्यानंतर 47व्या षटकात त्याने नसीम शाहला झेलबाद करत पाकिस्तानच्या शेवटच्या फळीकडे वाटचाल सुरू केली. शेवटच्या षटकांत हारिस रौफ आणि खुशदिल शाहने काही फटकेबाजी करत पाकिस्तानला 240 धावांचा टप्पा पार करून दिला. अखेरच्या चेंडूवर अतिरिक्त धावा घेण्याच्या प्रयत्नात हारिस रौफ धावबाद झाला आणि पाकिस्तानचा संपूर्ण डाव 241 धावांवर संपुष्टात आला.

भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेत शानदार कामगिरी केली. 9 षटकांत 40 धावा देत त्याने पाकिस्तानच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. हार्दिक पंड्यानेही भेदक गोलंदाजी करत 8 षटकांत 31 धावांत 2 विकेट्स घेतल्या. हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 1-1 बळी घेत पाकिस्तानचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत पाकिस्तानला मोठा स्कोअर करण्याची संधी दिली नाही.  


सम्बन्धित सामग्री