भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिका नुकतीच पार पडली. ही मालिका अनिर्णित राहिल्यामुळे कोणताही संघ कसोटी मालिकेवर विजयाची मोहोर उमटवू शकला नाही. दरम्यान, कसोटी मालिकेसोबतच भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या अचानक मालिका अर्ध्यावर सोडून मायदेशी परतण्याची चर्चाही तेवढीच रंगली होती. जसप्रीत बुमराहनं इंग्लंड सीरिजमध्ये चांगली खेळी दाखवली होती. त्याने पाचपैकी केवळ तीन कसोटी मालिकांमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यापैकी दोन सामने भारताने गमावले होते. तर मँचेस्टरमध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये बुमराह उत्साहीत दिसला नाही. त्याशिवाय बुमराहचा गोलंदाजीचा वेगही मंदावला होता. त्यामुळे त्याच्या कसोटी सामन्यातील निवृत्तीच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र जसप्रीत बुमराहनं या सर्व चर्चांना पूर्णविराम दिले आहे. त्याने आपल्या कसोटी सामन्यांच्या खेळासंबंधीत इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना याबाबत सांगितले आहे.
हेही वाचा: Asia Cup 2025: 'लगान' वसूल केल्यानंतर आता टीम इंडियाचं पुढचं मिशन काय? जाणून घ्या संपूर्ण क्रिकेट शेड्यूल
आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या जसप्रीत बुमराह हे भारतीय क्रिकेट संघातील सर्वात महत्त्वाचे खेळाडू आहेत. बुमराह आपल्या पाठीच्या दुखण्यातून नुकतेच बाहेर पडले आहेत. त्यावेळी त्याला वर्कलोडवर लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर बुमराह पाचपैकी तीनच मालिका खेळणार, असे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले होते.
जसप्रीत बुमराहनं पोस्ट शेअर करत म्हटले की, एका अत्यंत स्पर्धात्मक आणि रोमांचक कसोटी मालिकेतील उत्तम आठवणी आम्ही परत घेऊन आलो आहोत! क्रिकेटमध्ये पुढे काय होईल याची उत्सुकता आहे.