Thursday, August 21, 2025 03:27:22 AM

WPL 2025 : RCB ने रचला इतिहास! WPL मध्ये सर्वात मोठ्या धावसंख्येचा केला यशस्वी पाठलाग

WPL 2025 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या RCB संघाने इतिहास रचला आहे. त्यांनी GG संघाविरूद्ध 202 धावांचे लक्ष्य गाठत WPL मध्ये सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारा संघ होण्याचा मान मिळवला

wpl 2025  rcb ने रचला इतिहास wpl मध्ये सर्वात मोठ्या धावसंख्येचा केला यशस्वी पाठलाग
WPL 2025 : RCB ने रचला इतिहास! WPL मध्ये सर्वात मोठ्या धावसंख्येचा केला यशस्वी पाठलाग

वूमन्स प्रीमियर लीग अर्थात WPL 2025 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने इतिहास रचला आहे. त्यांनी गुजरात जायंट्स संघाविरूद्ध 202 धावांचे विशाल लक्ष्य गाठत WPL इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारा संघ होण्याचा मान मिळवला. या विजयात एलिसा पेरी, रिचा घोष यांनी आक्रमक अर्धशतके झळकावत आपलं योगदान दिले. 

वडोदऱ्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात RCB ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरात जायंट्सने कर्णधार अॅश्ले गार्डनरच्या तुफानी खेळीच्या जोरावर 5 विकेट्स गमावत 201 धावांचे मोठे आव्हान उभे केले. गार्डनरने 37 चेंडूत 8 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने 79 धावा चोपत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. बेथ मुनीने देखील 56 धावांची खेळी साकारत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

हेही वाचा - Champions Trophy 2025: बुमराह चॅम्पियन ट्रॉफीतून बाहेर, टीम इंडियाला मोठा धक्का; 'हा' बदली खेळाडू संघात

गुजरात जाइंट्सचे 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना RCB च्या संघाला सुरुवातीला मोठे धक्के बसले. पण एलिस पेरी (57 धावा) आणि राघवी बिश्त (25 धावा) या जोडीने RCB चा  डाव सावरला. त्यानंतर रिचा घोष आणि कनिका अहुजा यांनी हाणामारीच्या षटकात फटकेबाजी करत सामना RCB च्या बाजूने फिरवला. रिचा घोषने 27 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारासह 64 धावांची ताबडतोड खेळी केली. त्याने षटकार खेचत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

हेही वाचा -  IPL 2025 : RCB चा नवा कर्णधार कोण?, विराट ऐवजी ‘या’ खेळाडूकडं कमान!

WPL इतिहासात सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग
RCB ने 10 चेंडू शिल्लक ठेवत 202 धावांचे लक्ष्य गाठले. यापूर्वी हा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर होता. 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने गुजरात जायंट्स विरुद्ध 191 धावांचे लक्ष्य गाठले होते. आता हा विक्रम आरसीबीच्या नावे झाला असून या ऐतिहासिक विजयासह RCB ने वुमन्स प्रीमियर लीगमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.  
 
WPL स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणारे संघ 

202 – RCB वि. GG, वडोदरा, 2025
191 – MI वि. GG, दिल्ली, 2024
189 – RCB वि. GG, ब्रेबॉर्न, 2025
179 – UPW वि. GG, ब्रेबॉर्न, 2023
172 – MI वि. DC, बंगळुरू, 2024


सम्बन्धित सामग्री