Wednesday, August 20, 2025 09:26:46 AM

ICC World Test Championship Final 2025: भारतात WTC फायनल होणार की नाही?

दोन पराभवांनंतर भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, भारताच्या आशांना धक्का बसल्याचे दिसून येत आहे.

icc world test championship final 2025 भारतात wtc फायनल होणार की नाही

नवी दिल्ली: 11 जून 2025 पासून डब्ल्यूटीसी म्हणजेच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू झाला आहे. त्यामुळे या फायनल सामन्यात कोणता संघ जिंकणार? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. अशातच, दक्षिण आफ्रिकेचा संघ इतिहास रचण्यापासून फक्त 69 धावा दूर आहे. तसेच, त्यांच्याकडे फक्त आठ विकेट शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत, यावर्षी कसोटीला एक नवीन विजेता मिळू शकतो. 2021 मध्ये न्यूझीलंडने आणि 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने विजेतेपद जिंकले होते.

मात्र, गेल्या दोन अंतिम सामन्यात भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. दोन पराभवांनंतर भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, भारताच्या आशांना धक्का बसल्याचे दिसून येत आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, आयसीसी भारतात अंतिम सामना आयोजित करण्यास तयार नाही. पुढील तीन अंतिम सामन्यांसाठी आयसीसी इंग्लंडसोबत करार करणार आहे.

हेही वाचा: 'सर्व मांसाहारी आणि मद्य विक्री दुकाने बंद ठेवावे'; सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

आयसीसी इंग्लंडच्या समर्थनात:

टेलिग्राफ यूकेमधील एका वृत्तानुसार, भारताचे माजी कर्णधार रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स यांच्या पाठिंब्यानंतरही डब्ल्यूटीसी (WTC) फायनल इंग्लंडबाहेर हलवण्याची शक्यता कमी आहे. वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (ECB) पुढील तीन विंडोसाठी इंग्लंडमध्ये अंतिम सामने आयोजित करण्याचा आपला हेतू कळवला आहे. त्यांनी म्हटले, 'भारताने या शोपीस स्पर्धेचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली असली तरीही इंग्लंड क्रिकेट पुढील तीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यांचे आयोजन करण्यासाठी आयसीसीशी सहमत होण्याच्या जवळ आहे'.

पुढील तीन आवृत्त्यांचे अंतिम सामने इंग्लंडमध्ये होतील:

आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी बीसीसीआयमध्ये सचिव म्हणूनही काम केले आहे. जेव्हा भारताने अंतिम फेरीत पोहोचण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा जय शाह बीसीसीआयचे सचिव होते. एका अहवालानुसार, आयसीसीच्या भागधारकांनी यावर चर्चाही केली आहे. परंतु, ते अंतिम सामना भारतात आयोजित करण्यावर एकमत झालेले दिसत नाहीत. अशातच, इंग्लंडला आता पुढील तीन आवृत्त्यांच्या (2027, 2029 आणि 2031) अंतिम सामन्यांचे आयोजन करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. आयसीसी जुलैमध्ये सिंगापूरमध्ये होणाऱ्या त्यांच्या पुढील वार्षिक परिषदेत याची घोषणा करू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा: दादर येथे असलेल्या सावरकर सदनचे बांधकाम ‘जैसे थे’च

सिंगापूरमध्ये लागू शकतो शिक्कामोर्तब:

'पुढील महिन्यात सिंगापूरमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत या निर्णयाला मान्यता दिली जाईल', असे अहवालात म्हटले आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुरू असलेला अंतिम सामना संपल्यानंतर लगेचच ईसीबी 2027 च्या जागतिक क्रिकेट परिषदेच्या अंतिम सामन्याचे नियोजन सुरू करेल. तीन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे आयोजन करूनही, गेल्या तीन आवृत्त्यांमध्ये इंग्लंडला अंतिम फेरी गाठता आली नाही.


सम्बन्धित सामग्री