अहमदाबाद: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातातील मृतांच्या बाबतीत एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, अपघातात मृत्यू झालेल्या एका प्रवाशाचा मृतदेह चुकीने दुसऱ्याच कुटुंबाला सोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नातेवाईकांनी डीएनए चाचणी केली असता मृतदेह त्यांचा नसल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही हा अहवाल पाहिला आहे आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहोत. अपघातानंतर पीडितांची ओळख प्रोटोकॉल आणि तांत्रिक प्रक्रियेनुसार करण्यात आली होती. सर्व मृतदेह अत्यंत सन्मानाने हाताळण्यात आले.
हेही वाचा - ''1 हजार DNA चाचण्या केल्या जातील''; अहमदाबाद विमान अपघातानंतर अमित शाहाचे मोठे विधान
नेमकं काय घडलं?
अहमदाबाद विमान अपघातात अनेक ब्रिटिश नागरिकांचाही मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मृतदेह ब्रिटनला पाठवण्यात आले. मात्र, एका ब्रिटिश कुटुंबाला दिलेला मृतदेह त्यांच्या नातेवाइकाचा नसून दुसऱ्याच प्रवाशाचा असल्याचे डीएनए चाचणीतून निष्पन्न झाले. यानंतर दोन्ही देशांनी या चुकांबाबत सखोल चौकशी सुरू केली आहे. ही बाब लवकरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या भेटीत चर्चेचा विषय ठरू शकते.
हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघाताची चौकशी कोण करणार? काय आहेत नियम? जाणून घ्या
या चुकीमुळे भारतातील यंत्रणांवर प्रश्न उपस्थित होत असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या व्यवस्थापन कौशल्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या त्रासातून गेलेल्या कुटुंबांसाठी ही एक दुहेरी शोकांतिका ठरली आहे.