Egg Shortage and Rent the Chicken : वेगवेगळ्या कारणांमुळे जगभरात महागाई वाढली आहे. अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढलेले दिसत आहेत. शिवाय, बर्ड फ्लू आणि कोंबड्यांमध्ये होणाऱ्या इतर साथीच्या रोगांमुळे अंड्यांच्या किमती वाढल्या आहेत. अमेरिकेतील घाऊक बाजारात अंड्यांचे दर प्रति डझन सात ते आठ डॉलर्सवर (600 ते 650 रुपये) पोहोचले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात ही अंडी आणखीनच महाग झाली आहेत. त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम झाला आहे. हीच बाब लक्षात घेता, अमेरिकेतील कंपन्यांनी अंडी उत्पादनावर भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी ‘रेंट-द-चिकन’ ही नवीन स्कीमही सुरू केली आहे. ज्यामुळे नागरिकांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत अंडी मिळत आहेत. दरम्यान, ‘रेंट-द-चिकन’ म्हणजे काय, ही प्रक्रिया कशी राबवली जाते, यामागचा नेमका हेतू काय, हे जाणून घेऊ.
हेही वाचा - 'अमेरिकेने सोडली साथ, ब्रिटनने पुढे केला हात,' युक्रेन-रशिया युद्ध संपुष्टात येण्याची आशा धूसर?
रेंट-द-चिकन म्हणजे काय? (What is Rent the Chicken)
जगभरातील अनेक देशांमध्ये कोंबडीच्या अंड्यांच्या किमती वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. हॉटेलमध्येही अंड्यांचे पदार्थ महाग झाले आहेत. अमेरिकेन कंपन्यांनी अंड्यांच्या वाढत्या दरांवर मार्ग काढण्यासाठी सध्या ‘रेंट-द-चिकन’ ही नवीन स्कीम सुरू केली आहे. याला प्रतिसादही चांगला मिळत आहे.
‘रेंट-द-चिकन’ म्हणजेच कोंबड्या भाड्याने देणे. देशभरातील अंड्यांचे उत्पादन वाढावे आणि अंड्यांचे दर झपाट्याने कमी व्हावेत यासाठी अमेरिकन कंपन्यांनी ही अनोखी कल्पना शोधून काढली आहे. अंडी देणाऱ्या कोंबड्या कंपन्यांकडून भाड्याने दिल्या जात आहेत. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर कंपनी ग्राहकांना दोन किंवा चार कोंबड्या भाड्याने घेण्याची संधी देते. या कोंबड्यांना कंपनीकडून आवश्यक ते खाद्यही पुरवले जाते. त्यांच्या संगोपनासाठी ग्राहकांना काही मार्गदर्शक सूचनादेखील दिल्या जातात. या सेवेंतर्गत लोक कोंबडी भाड्याने घेऊ शकतात आणि त्यांच्या घरी ताजी अंडी ठेवू शकतात.
अंड्यांचा तुटवडा होण्याचे गांभीर्य किती आहे? आणि ‘रेंट-द-चिकन’ची मागणी का वाढली?
अमेरिकेत मागणीच्या तुलनेत अंड्यांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून अमेरिकेत अंड्यांचे दर गगनाला भिडले आहेत. अमेरिकन लोकांच्या आहारात मांसाहार आणि अंडी हा एक महत्त्वाचा घटक आहे. अंडी महाग होऊनही लोक अंडी खरेदी करण्यासाठी दुकानांसमोर तासन् तास रांगेत उभे राहात आहेत. अनेकांवर तासन् तास थांबूनही कधी रिकाम्या हाताने परतण्याची वेळ येत आहे. अंड्यांच्या वाढत्या दरांमुळे चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात ग्रीन कॅसल शहरात उभ्या असलेल्या एका ट्रकमधून अनोळखी चोरट्यांनी एक लाख अंडी चोरून नेली आहेत. एका वृत्तानुसार, या अंड्यांची किमत सुमारे 40 हजार डॉलर्स (34 लाख रुपये) इतकी होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून चोरट्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
दोन कोंबड्यांचे सहा महिन्यांचे भाडे 600 डॉलर्स
'दोन कोंबड्यांचे सहा महिन्यांचे भाडे 600 डॉलर्स इतके आहे. सर्वसाधारपणे नागरिकांना अंडी विकत घेण्यासाठी महिन्याला 300 डॉलर्सचा (26,148 रुपये) खर्च येऊ शकतो. काही शहरांमध्ये अंड्यांचा दर प्रति डझन आठ डॉलर्स (697 रुपये) इतका आहे. त्यामुळे कंपनीने शोधून काढलेली ही अनोखी कल्पना ग्राहकांसाठी फायदेशीर आहे,' असे सांगण्यात आले आहे. थोडक्यात, रेंट द चिकन म्हणजे कोंबडी भाड्याने घेऊन पाळणे आणि स्वतःसाठी आणि मोजक्या ग्राहकांना काही प्रमाणात विकण्यासाठी स्वतःच अंड्यांचे उत्पादन घेणे.
हेही वाचा - अब्जाधीश एलोन मस्क बनले 14 व्या मुलाचे बाप, शिवॉन झिलिससह गुपचुपपणे केले बाळाचे स्वागत
अंड्याचा दर का वाढला आणि अंड्यांचे दर कमी होतील का?
अमेरिकेत अंड्यांच्या किमती वाढण्यामागे पॅथोजेनिक एव्हियन इन्फ्लुएंझा (HPAI) आणि बर्ड फ्लूचा प्रसार कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. 2022 मध्ये अमेरिकेत या विषाणूमुळे लाखो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यामुळे अंडी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. 2022 नंतर 2024 मध्ये या विषाणूचा अमेरिकेत झपाट्याने प्रसार झाला. परिणामी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येच सुमारे 1.7 कोटी अंडी देणाऱ्या कोंबड्या मारण्यात आल्या. यूएसडीएच्या मते, 2025 मध्येही अमेरिकेत हे संकट कायम आहे. गेल्या आठवड्यातच अॅरिझोना, कॅलिफोर्निया, उत्तर कॅरोलिना, ओहायो, मिसूरी, इंडियाना व वॉशिंग्टनमध्ये एव्हियन इन्फ्लुएंझा विषाणुमुळे जवळपास 1.4 कोटी कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. दरम्यान, अमेरिकेत अंड्यांच्या किमती कधी आटोक्यात येतील याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. विषाणूचा प्रादुर्भाव असाच कायम राहिला, तर आगामी काळात अंड्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.