Donald Trump On DOGE: भारत आणि अमेरिकेचे संबंध पूर्वीपासून सलोख्याचे आहेत. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेची सूत्रे स्वीकारल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती. एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) ने भारतात मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी मंजूर केलेला 21 दशलक्ष डॉलरचा निधी रद्द केला आहे. भारतातील निवडणूक प्रक्रिया अधिक चांगली आणि प्रभावी बनवण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने या निधीला मान्यता दिली होती. तथापी, आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक मोठे विधान समोर आले आहे.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
फ्लोरिडा येथील त्यांच्या मार-ए-लागो निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'आपण भारताला 21 दशलक्ष डॉलर्स का देत आहोत? त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि ते जगातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहेत. मला भारताबद्दल खूप आदर आहे. मला पंतप्रधानांबद्दल खूप आदर आहे. ते नुकतेच अमेरिकाला भेट देऊन गेले. पण आपण मतदान करण्यासाठी भारताला 21 दशलक्ष डॉलर्स देत आहोत?'
हेही वाचा - Tesla Hiring : पंतप्रधान मोदी-एलॉन मस्क भेटीनंतर भारतात टेस्लामध्ये नोकऱ्यांची संधी, ‘या’ पदासाठी भरणार जागा!
DOGE ने निधी थांबवण्याची घोषणा केली होती -
एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन सरकारच्या कार्यक्षमता विभागाने विविध देशांना निधी देणे थांबवण्याची घोषणा केली होती, ज्यामध्ये भारतात मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी 21 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची रक्कम देखील समाविष्ट होती. DOGE ने म्हटले होते की, अमेरिकेने भारतात मतदारांची संख्या वाढवण्यासाठी तयार केलेल्या 21 दशलक्ष डॉलर्स निधीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या DOGE अमेरिकन सरकारी खर्चात कपात करत आहे.
हेही वाचा - पंतप्रधान मोदी भारतात परतताच एलोन मस्क यांनी घेतला मोठा निर्णय; लाखो डॉलर्सचा निधी थांबवला
अमेरिकन सरकार खर्चात कपात करत आहे -
अमेरिकेतील DOGE च्या निर्णयानंतर, भारताला आता हे निधी मिळणार नाही. विशेष म्हणजे ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील भेटीनंतर काही दिवसांनीच DOGE ने ही घोषणा केली. खरं तर, ट्रम्प यांनी सरकारी खर्च कमी करण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) नावाचा एक नवीन विभाग तयार केला आहे, ज्याचे प्रमुख टेस्लाचे मालक एलोन मस्क आहेत. या विभागाने अनेक देशांना देण्यात येणारा निधी बंद केला आहे.