Tesla Car Production In India: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, उद्योगपती एलोन मस्क यांची कंपनी टेस्लाची आता भारतात एन्ट्री होणार आहे. एलोन मस्क लवकरच भारतातही त्यांच्या कंपनी टेस्लाचा व्यवसाय वाढवणार आहेत. टेस्ला कंपनीची इलेक्ट्रिक वाहने खूप प्रसिद्ध आहेत. आता टेस्ला भारतात प्रवेश केल्यानंतर भारतातही टेस्लाच्या कार रस्त्यावर धावताना दिसणार आहेत.
एलोन मस्क यांनी घेतली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट -
अलिकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी टेक दिग्गज आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदी आणि एलोन मस्क यांच्यातील या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली. यासोबतच, या बैठकीत टेस्लाच्या भारतातील व्यवसायावरही चर्चा झाली. एवढेच नाही तर पंतप्रधान मोदी आणि एलोन मस्क यांच्यातील या बैठकीनंतर, टेस्लाने भारतातील त्यांच्या कंपनीसाठी भरती प्रक्रियेची घोषणाही केली आहे.
हेही वाचा - Tesla Hiring : पंतप्रधान मोदी-एलॉन मस्क भेटीनंतर भारतात टेस्लामध्ये नोकऱ्यांची संधी, ‘या’ पदासाठी भरणार जागा!
'या' राज्यात तयार होणार टेस्लाच्या गाड्या -
टेस्ला आता भारतात त्यांच्या वाहनांच्या निर्मितीसाठी जमीन शोधत आहे. अहवालानुसार, टेस्लाचे पुण्यात आधीच कार्यालय असल्याने, टेस्ला महाराष्ट्रात आपला कारखाना उभारू शकते. सरकार यासाठी चाकण आणि चिखलीजवळील जागा देण्यावर विचार करत आहे. चाकण हे भारतातील सर्वात मोठ्या ऑटो मॅन्युफॅक्चरिंग हबपैकी एक आहे. येथे मर्सिडीज बेंझ, टाटा मोटर्स फोक्सवॅगन आणि अनेक मोठ्या कंपन्या आहेत.
हेही वाचा - 'भारताकडे भरपूर पैसा आहे, त्यांना निधीची गरज नाही'; Donald Trump असे का म्हणाले?
अहवालानुसार, भारतात टेस्ला दोन शोरूम उघडेल. हे दोन्ही शोरूम मुंबई आणि देशाची राजधानी दिल्ली येथे उघडणार आहेत. टेस्लाचे दिल्लीतील शोरूम इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एरोसिटी परिसरात उघडणार आहे. तसेच टेस्लाचे मुंबईतील शोरूम वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) जवळील विमानतळाजवळ उघडणार आहे. मुंबई आणि दिल्लीतील हे टेस्ला शोरूम अंदाजे 5 हजार चौरस फूट क्षेत्रात असतील.
एप्रिल 2025 पासून सुरू होईल टेस्लाच्या कारची विक्री -
एप्रिल महिन्यापासून भारतात टेस्ला इलेक्ट्रिक कारची विक्री सुरू होईल. सुरुवातीला, कंपनी भारतातील बर्लिन प्लांटमधून आयात केलेल्या वाहनांची विक्री करेल. टेस्ला भारतात स्वस्त ईव्ही मॉडेल्स सादर करणार आहे. भारतात टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची किंमत सुमारे 21 लाख रुपये असू शकते.