Sunday, August 31, 2025 08:40:27 AM

भूकंपाच्या हादऱ्यांनाही हरवता आलं नाही डॉक्टरांचं धैर्य! रशियन डॉक्टरांचा धाडसी व्हिडिओ व्हायरल

भूकंपाच्या वेळी डॉक्टर रुग्णालयात शस्त्रक्रिया करत होते. संपूर्ण ऑपरेशन थिएटर हादरत असतानाही त्यांनी ऑपरेशन थांबवले नाही.

भूकंपाच्या हादऱ्यांनाही हरवता आलं नाही डॉक्टरांचं धैर्य रशियन डॉक्टरांचा धाडसी व्हिडिओ व्हायरल
Edited Image

टोकियो: रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात बुधवारी सकाळी 8.8 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. मात्र, या नैसर्गिक आपत्तीतही डॉक्टरांचे धैर्य आणि आत्मविश्वास डगमगला नाही. भूकंपाच्या वेळी डॉक्टर रुग्णालयात शस्त्रक्रिया करत होते. संपूर्ण ऑपरेशन थिएटर हादरत असतानाही त्यांनी ऑपरेशन थांबवले नाही. शस्त्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच त्यांनी आपले काम थांबवले. सध्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या रुग्णाची प्रकृतीही पूर्णपणे स्थिर असल्याचे रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. 

भूकंपात ऑपरेशन थिएटर हादरलं - 

भूकंपाच्या तीव्रतेमुळे संपूर्ण रुग्णालयाच्या इमारतीला हादरे बसले, तरीही डॉक्टरांनी संयम न सोडता ऑपरेशन थेट पूर्ण केले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भूंकपामुळे इमारत हादरत असताना डॉक्टर शांतपणे ऑपरेशन करताना दिसत आहेत. हा क्षण पाहून संपूर्ण जगभरातून डॉक्टरांच्या या शौर्याचे आणि समर्पणाचे कौतुक होत आहे.

हेही वाचा - 5000 फूट उंचीवर विमानाचे इंजिन बिघडले; बोईंग ड्रीमलाइनरचे आपत्कालीन लँडिंग

प्रशांत महासागरात त्सुनामीची लाट -  

या भूकंपामुळे प्रशांत महासागरात त्सुनामीच्या लाटा उसळल्या. अमेरिकेच्या अलास्का, हवाई आणि न्यूझीलंडच्या दक्षिण किनाऱ्यांवर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तथापी, हवाईतील होनोलुलु येथे सायरन वाजवण्यात आले आणि नागरिकांना उंच ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या. जपान हवामानशास्त्र संस्थेच्या माहितीनुसार, 30 सेमी उंचीची पहिली त्सुनामी लाट होक्काइडोच्या नेमुरो भागात पोहोचली आहे. यामुळे किनारी भागात काही नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा - रशियामध्ये 50 प्रवाशांना घेऊन जाणारे अंगारा एअरलाइन्सचे विमान कोसळले

सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे स्थलांतर सुरू - 

कामचटका आणि आसपासच्या भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आपत्कालीन पथकांनी मदत कार्य सुरू केले आहे. स्थानिक प्रशासन व आंतरराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तात्काळ सक्रिय झाल्या आहेत.


सम्बन्धित सामग्री