Thursday, August 21, 2025 12:04:16 AM

Anganwadi Scam Exposed: ग्रामपंचायत सरपंच-सचिवांनी अंगणवाडीची इमारतच खाल्ली

कवडगावात अंगणवाडी बांधकामाच्या नावाखाली सरपंच-सचिवांनी 2.18 लाखांचा अपहार केला. चौकशीत प्रकार उघड; ग्रामस्थांनी कारवाईची मागणी केली आहे. लहानग्यांचे शिक्षण वंचित.

anganwadi scam exposed ग्रामपंचायत  सरपंच-सचिवांनी अंगणवाडीची इमारतच खाल्ली

बुलढाणा: ‘कुंपणच शेत खातंय’ ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कवडगाव येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील अंगणवाडीच्या बांधकामासाठी निधी मिळूनही, प्रत्यक्षात एक वीटही न उभी करता ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव यांनी तब्बल 2 लाख 18 हजार रुपये अपहार केल्याचं उघडकीस आलं आहे.

गावातील लहानग्यांसाठी अंगणवाडीची अत्यंत गरज असताना, एका जागरूक ग्रामस्थाने पंचायत समितीकडे यासंदर्भात तक्रार केली होती. यानंतर ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आलं की, अंगणवाडीचं बांधकाम आधीच पूर्ण झालं आहे. मात्र वस्तुस्थिती तपासली असता, कोणतेही बांधकाम झालेले नसल्याचे समोर आले.

हेही वाचा: बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याची सुरुवात कुठून झाली? पुरावे 'जय महाराष्ट्र'च्या हाती

या प्रकरणाची चौकशी गटविकास अधिकाऱ्यांनी केली असता, अंगणवाडी बांधकामाच्या नावाखाली निधीचा अपहार झाल्याचं चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामुळे गटविकास अधिकाऱ्यांना पुढील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गावकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया
गावातील पंजाबराव राठोड यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'ग्रामपंचायत आणि सचिवांनी मिळून हा प्रकार केला असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा.' तर अंगणवाडीसाठी आपली जमीन दान देणारे आनंदराव शिंगणे यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनीही यासंदर्भात स्पष्ट केलं आहे की, 'चौकशी अहवालातून गैरव्यवहार सिद्ध झाला असून, गटविकास अधिकाऱ्यांनी पुढील कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.'
 


सम्बन्धित सामग्री