वाळूज पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर एटीएम फोडल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज पोलिस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर चोरट्यांनी धाडसी चोरी करत ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून चार चोरट्यांनी अवघ्या 6 मिनिटांत गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून 13 लाख 92 हजार 500 रुपये लंपास केले. शनिवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास बकवालनगर भागात ही घटना घडली.
बकवालनगर परिसरात अनेक मोठ्या कंपन्या आणि नागरी वसाहती असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. त्यामुळे अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये मोठ्या प्रमाणात रोकड ठेवली जाते. शनिवारी मध्यरात्री 1.47 वाजता चार चोरटे एटीएममध्ये शिरले. त्यातील एका चोरट्याने सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून सुरक्षा यंत्रणेला हुलकावणी दिली. त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडून 13.92 लाखांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले.
या घटनेदरम्यान एटीएमचा सायरन किंवा अलार्म काहीच वाजला नाही, यामुळे बँकेची सुरक्षा यंत्रणा निकामी झाली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चोरीची संपूर्ण घटना मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी फूटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. इतक्या जवळ पोलिस ठाणे असतानाही चोरी कशी झाली, यावर नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
वाळूज पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, फॉरेन्सिक तज्ञांकडून तपासणी सुरू आहे. चोरटे बाहेरून आले होते की स्थानिक होते, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.