प्रेम प्रकरणात झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना नविन पनवेल परिसरात उघडकीस आली आहे. जागृती असे २२ वर्षीय मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अटक केली आहे. निकेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेने पनवेल परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकेश आणि जागृती यांचे एकमेकांवर प्रेम होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले. तरी देखील आपली प्रेयसी ही दुसऱ्या मुलाच्या प्रेमात असल्याचा संशय निकेशला होता. याच संशयातून निकेशने जागृती हिची हत्या केली.
निकेशला जागृतीबद्दल संशय आल्यानंतर तो जागृतीच्या घरी चाकू घेऊन गेला. तिथे जाऊन त्याने जागृतीला प्रथम शिवागाळ केली. त्यानंतर त्याने तिला मारहाण केली. रागाच्या भरात त्याने आणलेला चाकू काढला आणि जागृतीच्या गळ्यावर सपासप वार केले. वार केल्यानंतर त्याने त्याच चाकूने स्वत:वर देखील वार करत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.
मुलासोबत बोलताना पाहिलं आणि संशय वाढला
ब्रेकअप झाल्यानंतर देखील निकेश हा जागृतीवर लक्ष ठेऊन होता. त्याने जागृतीला एका मुलाशी बोलताना पाहिले. तेव्हा त्याला त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळल्याचा संशय आला. त्यानंतर त्याने जागृतीचे घर गाठत मारहाण केली. त्यानंतर आणलेल्या चाकूने गळ्यावर वार केले. यात जागृतीचा जागीच मृत्यू झाला. निकेशने देखील त्याच चाकून स्वत:च्या गळ्यावर वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यामुळे त्याचा जीव वाचला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी निकेशला तातडीने अटक केली. त्याच्याविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.