अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात असलेल्या वाघोली गावातील एका घरासमोरील रस्त्यावर ट्रॅक्टर थांबवल्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये किरकोळ वाद झाला. मात्र, काही वेळानंतर या वादाचे रूपांतर हिंसक मारहाणीमध्ये झाले. या घटनेमध्ये पीडित संपत रंगनाथ वांढेकर आणि त्यांची पत्नी आशाबाई संपत वांढेकर यांना पाच ते सहा जणांनी जबर मारहाण केली. इतकंच नाही, तर शेवगाव पोलिसांनी दाम्पत्याविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे वाघोली गावामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीपर्यंत:
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील रहिवासी अशोक देवराव कराळे यांचा ट्रॅक्टर डिझेल संपल्यामुळे रस्त्यावरच थांबला होता. हा ट्रॅक्टर वांढेकर कुटुंबाच्या घरासमोर लावल्यामुळे त्यांनी यावर आक्षेप घेतला. ज्यामुळे संपत वांढेकर आणि घरमालक अशोक कराळे यांच्यामध्ये किरकोळ वाद सुरू झाला. मात्र, थोड्याच वेळात दोघांमध्ये वाद वाढला. त्यानंतर घरमालक कराळे आणि इतर चार ते पाच जणांनी संपत आणि आशाबाई वांढेकर या पती-पत्नींना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
धोकादायक वस्तूंनी केली पती-पत्नींवर मारहाण:
पीडित संपत आणि आशाबाई या पती-पत्नींना दुचाकीची चेन, वायर रोप यासारख्या धोकादायक वस्तूंनी मारहाण करू लागले.
महिलेच्या अंगावर मुद्दाम दुचाकी गाडी घातली:
इतकंच नाही, तर हद्द तेव्हा पार झाली जेव्हा या मारहाणीमध्ये पीडित संपत यांच्या पत्नी आशाबाई वांढेकर यांच्या अंगावर मुद्दाम दुचाकी घालण्यात आली. या घटनेमुळे त्यांच्या हाताला गंभीर इजा होऊन फ्रॅक्चर झाले.
पती-पत्नी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक:
सध्या पीडित संपत आणि त्यांच्या पत्नी आशाबाई वांढेकर यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे त्यांच्यावर विशेष लक्ष आहे.
पीडित दाम्पत्याविरोधातच शेवगाव पोलिसांनी केला गुन्हा दाखल:
या घटनेमधील धक्कादायक गोष्ट म्हणजे, या प्रकरणात शेवगाव पोलिसांनी जखमी झालेल्या वांढेकर दाम्पत्याविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. ही बाब समोर येताच गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिस प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पीडितांवरच गुन्हा दाखल होणे हे अन्यायकारक असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर वाघोली गावात तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी गावामध्ये बंदोबस्त वाढवला असून पुढील कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक देखील पाठवण्यात आले आहे.