मुंबई : सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) मुंबईतील 12 ठिकाणी छापे टाकले आहेत. हे छापे रियाल्टो एक्सिम प्रायव्हेट लिमिटेड, पुष्पक बुलियन प्रायव्हेट लिमिटेड, चंद्रकांत पटेल आणि इतरांविरुद्ध बँक फसवणुकीबाबत सुरू असलेल्या तपासाशी संबंधित असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली. या कारवाईत स्थावर मालमत्ता तसेच बँकेतील निधी, तसेच विविध आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.
सीबीआयने बँक फसवणूक व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्याच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करत आहेत. त्यात रियाल्टो एक्सिम प्रायव्हेट लिमिटेड आणि वर्ल्ड क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या गैरव्यवहाराचे पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत. ईडीने वर्ल्ड क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर संबंधित बैंक फसवणुकीच्या प्रकरणी मुंबईतील आठ ठिकाणी छापे टाकले. याबाबतची माहिती शनिवारी ईडीकडून देण्यात आली.
या शोध मोहिमेदरम्यान स्थावर मालमत्तांच्या खरेदीसंबंधी अनेक आक्षेपार्ह पुरावे जप्त करण्यात आले. गैरव्यवहारातून मिळालेल्या पैशांचा वापर मालमत्ता खरेदी करण्यासाठी करण्यात आला आहे. गैरव्यवहारासाठी आरोपींनी बनावट कंपन्यांचे जाळे तयार केले होते. चंद्रकांत पटेल आणि इतरांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया यांना 142 कोटी 72 लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. बँकांना फसवण्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून कर्जे घेतली आणि ती परतफेड केली नाही.
ईडीच्या या कारवाईत बँक फसवणुकीशी संबंधित महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. यात बँक खात्यांचे तपशील, मोठ्या रकमेचे व्यवहार, बनावट कंपन्यांचे दस्तऐवज आणि स्थावर मालमत्तांच्या व्यवहारांचे दस्तऐवज समाविष्ट आहेत. आरोपींनी बँक फसवणुकीद्वारे मिळवलेल्या पैशांचा उपयोग विविध मालमत्ता खरेदीसाठी केल्याचे उघड झाले आहे. ईडीकडून पुढील तपास सुरू असून, इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.