Rape Case: कर्नाटकमधील मोठ्या राजकीय घराण्याशी संबंधित आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू असलेल्या प्रज्ज्वल रेवण्णा यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. विशेष न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे केवळ कर्नाटकच नव्हे तर देशभरात चर्चा सुरु झाली आहे.
हा खटला माजी खासदार असलेल्या प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या घरकाम करणाऱ्या ४७ वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्कारप्रकरणाशी संबंधित आहे. ही घटना त्यांच्या फार्महाऊसवर घडली होती. इतकंच नव्हे, तर या घृणास्पद कृत्याचे विडिओ रेकॉर्डिंग देखील त्यांनी केले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महत्त्वाचा साक्षीदार ठरला ड्रायव्हर
या प्रकरणात रेवण्णाचे माजी वाहनचालक कार्तिक एन. (वय 34) हा महत्त्वाचा साक्षीदार ठरला. त्याने न्यायालयात दिलेल्या साक्षीत स्पष्ट केले की, रेवण्णाच्या मोबाइलमध्ये जवळपास 2000 अश्लील फोटो आणि 30 ते 40 महिलांशी संबंधित 40-50 अश्लील व्हिडिओ होते. या माहितीने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, खास आमदार/खासदार न्यायालयात खटला चालवण्यात आला, आणि तब्बल 1699 पानांचे आरोपपत्र पोलिसांनी सादर केले. या आरोपपत्रात अनेक अस्वस्थ करणाऱ्या आणि अमानुष गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.
पीडित महिलांवरील दबाव आणि धमक्या
अनेक पीडित महिलांनी चौकशीत सांगितले की, रेवण्णा अत्याचार करताना महिलांना विशिष्ट कपडे घालण्यास भाग पाडायचा, बंदुकीचा धाक दाखवून त्यांना जबरदस्तीने हसवायचा आणि सर्व प्रकारचं चित्रिकरण करायचा. जर कोणी या प्रकाराबद्दल तक्रार केली, तर तो त्या व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत असे.
घटनांचा काळ, ठिकाण आणि स्वरूप
असं म्हटलं जातं की 2020 ते 2023 दरम्यान रेवण्णाने अनेक वेळा पीडित महिलांवर अत्याचार केले, आणि हे सर्व त्याच्या होलेनरासीपुरा येथील निवासस्थानी, तिसऱ्या मजल्यावरील खोलीत घडल्याचं आरोपपत्रात नमूद आहे. या घटनांचे व्हिडिओ पुरावे म्हणून तपास यंत्रणांकडे असल्याची माहिती आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
प्रज्ज्वल रेवण्णा हे जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या काकांचा आणि वडिलांचा राजकीय वारसा मोठा असून त्यांचे काका एच.डी. कुमारस्वामी हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे या प्रकरणामुळे संपूर्ण कुटुंबाच्या आणि पक्षाच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे.