गोंदिया : गोरेगाव येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणात आरोपी शकील सिद्दीकी याच्यावर आणखी कठोर कलमांची भर करण्यात आली आहे. दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी अपराध क्रमांक 49/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 आणि 328 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला त्याच दिवशी अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
तपासादरम्यान मृतक मुलीच्या आईने तिच्या वयासंबंधी तसेच जात प्रमाणपत्र सादर केले आहे. या प्रमाणपत्रावरून मृतक मुलगी 16 वर्षे 9 महिने वयाची आणि अनुसूचित जातीतील (SC) समाजाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, आरोपीने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीने पीडितेवर गर्भपात करण्यासाठी दबाव आणला आणि तिचे गर्भाशयात असलेले अर्भक जन्मास येण्यापूर्वीच नष्ट केले.
या गंभीर गुन्ह्याच्या तपासात महत्त्वाचे पुरावे हाती आल्याने गुन्ह्यात कलम 64(2)(m) आणि 91 भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत नवीन कलमे जोडण्यात आली आहेत. त्याचबरोबर, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम-2012 (POCSO Act) मधील कलम 4 आणि 6 लागू करण्यात आले आहे. याशिवाय, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा-1989 सुधारणा कायदा-2015 मधील कलम 3(2)(V) अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी ही कलमवाढ करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास गोंदियाचे पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देवरी तसेच अतिरिक्त कार्यभार आमगावचे श्री. विवेक पाटील करत आहेत. गुन्ह्याची भीषणता लक्षात घेता पोलिसांनी अत्यंत गंभीरतेने तपास सुरू ठेवला असून, दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत.