Thursday, August 21, 2025 12:38:08 AM

दोन हृदयद्रावक घटना; कुर्ल्यात चार वर्षीय मुलीचा खून आणि अत्याचार

कुर्ल्यात चार वर्षीय मुलीवर अत्याचार; दोन अल्पवयीन आरोपींना अटक

दोन हृदयद्रावक घटना कुर्ल्यात चार वर्षीय मुलीचा खून आणि अत्याचार

मुंबई : कुर्ल्यात राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर संतप्त पित्याने आपल्या चार वर्षीय मुलीला जमिनीवर आपटून हत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी आरोपी परवेज सिद्धीकी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परवेज सिद्धीकी याचा पत्नी सबा हिच्यासोबत भांडण झाले. राग अनावर झाल्याने त्याने पत्नीला जबर मारहाण केली आणि नंतर रागात चार वर्षीय मुलगी आफियाला जमिनीवर आपटले. या अमानुष मारहाणीत आफिया गंभीर जखमी झाली. त्यानंतर चिमुकलीला तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

या दरम्यान, कुर्ल्यातच आणखी एका हृदयद्रावक घटनेत चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांवर चुनाभट्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही अल्पवयीन मुलांची रवानगी डोंगरी सुधारगृहात करण्यात आली आहे.पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून चुनाभट्टी पोलिसांनी दोघांवर भारतीय न्याय संहिता कलम 64, 65(2) व पोक्सो कायदा कलम 4, 6, 8, 10 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी पीडित मुलीला आरोपी मुले कुर्ला परिसरातील एका धार्मिक स्थळाजवळ घेऊन गेले. त्या ठिकाणी आरोपी मुलांनी मुलीवर अत्याचार केला. वेदनांनी असह्य झालेल्या मुलीने या घटनेची माहिती आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीला उपचारासाठी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 


सम्बन्धित सामग्री