बंगालाच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं देशात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील 5 दिवस देशातील अनेक भागामंमध्ये भारतीय हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात दडी मारून बसलेल्या पावसाचा गेल्या काही दिवसांपासून जोर वाढला आहे. शनिवारी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, आयएमडीकडून हाय अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबई पोलिसांनीदेखील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असेदेखील सांगण्यात आले आहे.मुंबई पोलिसांनी याबद्दची माहिती 'एक्स'वर दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, "सध्या मुंबई मध्ये सुरू असलेला संततधार पाऊस व हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या अनुषंगाने नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर जाणे टाळावे. तसेच समुद्रकिनारी व सखल भागात जाणे टाळा. पोलीसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून @MumbaiPolice सतर्क व मुंबईकरांच्या मदतीसाठी तत्पर आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास १०० / ११२ / १०३ डायल करा".
तसेच रत्नागिरी, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, पालघरला पावसाचा येलो अर्लट जारी करण्यात आला आहे.