मुंबई: अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी 12 वाजता लालबागच्या राजाच्या विसर्जनाला सुरुवात झाली. त्यानंतर रविवारी म्हणजे 7 सप्टेंबरला सकाळ 8 वाजता लालबागच्या राजाचे आगमन गिरगाव चौपाटीवर झाले. मात्र भरती आणि नवीन तराफा या समस्यांमुळे लालबागच्या राजाचे विसर्जनाला विलंब झाला. नैसर्गिक आणि तांत्रिक समस्यांमुळे लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला 12 तास गिरगाव चौपाटीवर थांबावे लागले. अखेर रविवारी रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. परंतु लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चौराचा सुळसुळाट पाहायला मिळाला.
लालबागच्या राजाची मिरवणुक 30 तास चालली. पण या मिरवणुकीचा फायदा चोरांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या मिरवणुकीत 100 हून अधिक मोबाईल चोरीला गेले आहेत. या प्रकरणात काळाचौकी पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत 10 गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी 4 गु्न्हे सोडवण्यात पोलिसांना यश आले असून त्यांनी मोबाइल फोन चोरीप्रकरणी 4 आरोपींना अटक केली आहे आणि चोरांकडून 4 मोबाइल फोन जप्त केले आहेत.
हेही वाचा: Lalbaugcha Raja Ganpati Visarjan : लालबागच्या राजाला निरोप, तब्बल 30 तासांनंतर विसर्जन संपन्न
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान सोन्याच्या साखळी चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 12 आरोपींना सोनसाखळी चोरीप्रकरणी ताब्यात घेतले आहे. तसेच दोन सोन्याच्या साखळ्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी अधिकचा तपास पोलीस करत आहेत.
लालबागच्या राजाच्या विसर्जनास विलंब
दरम्यान लालबागच्या राजाचे रविवारी सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर आगमन झाले. यानंतर राजाला तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न सुरु झाले. बाप्पाला नवीन तराफ्यावर चढवणे काही केल्या शक्य झाले नाही. पुढे भरती सुरु असल्याने तराफ्यावर चढवणे अवघड झाले. त्यामुळे सगळ्यांची चिंता वाढली. म्हणून ओहोटीच्या वेळी लालबागच्या राजाला तराफ्यावर चढवण्याचा निर्णय घेतला. अखेर ओहोटी सुरू झाल्यानंतर सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी नव्या तराफ्यावर लालबागच्या राजाची मूर्ती चढवण्यात मंडळाला यश आले. त्यानंतर रात्री 8 वाजता लालबागच्या राजाची उत्तर आरती संपन्न झाली. आरती संपन्न झाल्यानंतर थोड्या वेळाने लालबागच्या राजाच्या विसर्जनास सुरुवात झाली. अखेर रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.