मुंबई: मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, तर उर्वरित काही जिल्ह्यात संततधार पावसाचं वातावरण आहे. अशातच, 9 सप्टेंबर रोजी राज्यातील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि मुंबई जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. यासह, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका किंवा मध्यम पाऊस पडणार, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या, मराठवाड्यात पावसाने उसंत घेतली आहे. यासह, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार अशी शक्यता आहे. मागील काही दिवसांपूर्वी उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला होता, मात्र आता पावसाने विश्रांती घेतली आहे.
भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. यादरम्यान, विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे, 'नागरिकांनी आवश्यक असेल तरंच घराबाहेर पडा', असं आवाहन हवामान खात्याने दिला आहे.