Wednesday, August 20, 2025 12:58:38 PM

माजलगाव नगरपरिषदेतील भ्रष्टाचार उघड; चंद्रकांत चव्हाणांना 6 लाखांची लाच घेताना अटक

माजलगावचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण 6 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले; घरावर छापे, नगरोत्थान योजनेतील कामांसाठी 12 लाखांची लाचेची मागणी केल्याचा आरोप.

 माजलगाव नगरपरिषदेतील भ्रष्टाचार उघड चंद्रकांत चव्हाणांना 6 लाखांची लाच घेताना अटक

बीड: माजलगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना 6 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) छत्रपती संभाजीनगर पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी (10 जुलै) चव्हाण यांच्या माजलगाव येथील पिताजी नगरी भागातील निवासस्थानी करण्यात आली.

माजलगाव शहरात नगरोत्थान योजनेअंतर्गत विविध विकासकामे सुरू असून, त्यात सिमेंट रस्त्याचे कामही समाविष्ट आहे. या कामाचे सुमारे दोन कोटी रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी आणि उर्वरित कामांमध्ये रस्त्याच्या बाजूचे अतिक्रमण काढून अडथळे दूर करून देण्यासाठी चव्हाण यांनी तक्रारदार ठेकेदाराकडे 12 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी 6 लाख रुपये गुरुवारी देण्याचे ठरले होते, तर उर्वरित 6 लाख रुपये शुक्रवारी (11 जुलै) देण्याचे ठरले होते.

हेही वाचा: जळगावमधील आशादीप महिला वस्तीगृहात गतिमंद मुलीला मारहाण

तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कळवताच पथकाने सापळा रचून गुरुवारी ही कारवाई केली. तक्रारदाराने 6 लाख रुपयांची रक्कम घेऊन चव्हाण यांच्या घरी पोहोचल्यानंतर चव्हाण यांनी पैसे स्वीकारले आणि त्याच क्षणी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात अटक केली.

चंद्रकांत चव्हाण यांच्यावर कारवाई केल्यानंतर त्यांचे माजलगावमधील घर आणि जामखेडमधील दुसऱ्या घरावरही एसीबीने छापा टाकला असून, या ठिकाणी आणखी काही महत्त्वाची माहिती किंवा बेनामी संपत्ती हाती लागण्याची शक्यता आहे. झडतीनंतरच याचा अधिकृत तपशील मिळणार आहे.

हेही वाचा: Panvel: शालेय विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट धुवायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर

महाराष्ट्र शासनाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांमध्ये लाच मागण्याचे हे प्रकरण गंभीर मानले जात आहे. शासकीय अधिकाऱ्यांनीच अशा प्रकारे भ्रष्टाचार केल्यास सामान्य कंत्राटदार आणि नागरीकांमध्ये प्रशासनाविषयी अविश्वास वाढतो. चंद्रकांत चव्हाण यांच्यावरील पुढील कारवाई आणि त्यांच्यावर निलंबन किंवा नोकरीवरील निर्णय काय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 


सम्बन्धित सामग्री